आंबेडकरी चळवळीचे आधारवड एल. आर. बाली यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 10:07 PM2023-07-06T22:07:51+5:302023-07-06T22:08:12+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सेनानी, आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये याेद्धा व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कमांडर एल. आर. बाली यांचे गुरुवारी निधन झाले.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सेनानी, आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये याेद्धा व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कमांडर एल. आर. बाली यांचे गुरुवारी निधन झाले. जालंधर, पंजाब येथे निवासस्थानी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे हाेते.
२० जुलै १९३० ला पाकिस्तान भागात जन्मलेले बाली फाळणीनंतर दिल्लीला आले. १९३५ ते १९४६ दरम्यान लाहाेरच्या जात-पात ताेडक मंडळाच्या क्रांती या मासिकामुळे बाली बाबासाहेबांच्या विचार-कार्याने प्रभावित झाले हाेते. दिल्लीला आल्यानंतर बाली यांनी बाबासाहेबांच्या कार्यात सक्रियता वाढविली. १९५० पासून ते महामानवासाेबत काम करीत हाेते. डाॅ. बाबासाहेबांच्या निधनानंतर सरकारी नाेकरीचा राजीनामा देत बाली यांनी पूर्णपणे महामानवाच्या विचार प्रसारात स्वत:ला समर्पित केले. सप्टेंबर १९५९ मध्ये त्यांनी ‘भीम पत्रिका’चे प्रकाशन सुरू केले. या पत्रिकेतून ५० वर्षे महामानवाचे विचार देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले.
त्या काळात डाॅ. बाबासाहेबांचे विचार कार्य मराठी भाषेत उपलब्ध हाेते. त्यांच्या कार्याचा, विचारांचा प्रसार देशभरात व विदेशातही व्हावा यासाठी बाली यांनी हिंदीत लेखनाला सुरुवात केली. पत्रिकेतून अमर्याद लेखन करतानाच बाबासाहेबांचे विचार, कार्य, संविधान, त्यांच्या जीवनातील बारीकसारीक गाेष्टींचा सखाेल आढावा घेणाऱ्या ३५ च्यावर पुस्तकांचे लेखन, संपादन व प्रकाशन बाली यांनी केले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून देशभरात बहुजन समाजाला त्यांनी एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा साेहळ्यापासून बाली यांचा नागपूरशी घनिष्ठ संबंध राहिला आहे. एकदा नागपूरला झालेल्या कार्यक्रमात बाेलताना, ‘महामानवाचा सच्चा सेनानी म्हणवणे नाेबेल पुरस्कारासारखे आहे’, अशी भावना बाली यांनी व्यक्त केली हाेती. महामानवाच्या महापरिनिर्वाणानंतर ६७ वर्षांपर्यंत त्यांच्या विचारांचा प्रकाश सतत तेवत ठेवणाऱ्या बाली यांना आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले.