आंबेडकर भवनाच्या पुनर्निर्माणासाठी आंबेडकरी संघटना सरसावल्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:09+5:302021-08-20T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी गार्डन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासाठी आंबेडकरी संघटना सरसावल्या आहेत. गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी गार्डन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासाठी आंबेडकरी संघटना सरसावल्या आहेत. गुरुवारी इंदोरा चौकातील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा परिसरात विविध आंबेडकरी संघटना व रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यात आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. जोपर्यंत आंबेडकर भवनाचे पुनर्निर्माण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.
आंदोलनांतर्गत येत्या ३० ऑगस्ट रोजी संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. आंबेडकर भवन पाडण्यामागे मोठे षडयंत्र असून, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात येईल.
ज्येष्ठ साहित्यिक इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पीरिपाचे अरुण गजभिये, बाळूमामा कोसमकर, रिपाइं आठवलेचे बाळू घरडे, रिपब्लिकन एकता मंचच्या नगरसेविका वंदना भगत, रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) सूर्यभान शेंडे, रिपब्लिकन सेनाचे सागर डबरासे, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे ओंकार अंबादे, ओम अंबादे, समता सैनिक दलाचे विश्वास पाटील, डॉ. महेंद्र कांबळे, भीमशक्तीचे अनिल मेश्राम, भीमराज की बेटीच्या सोनिया गजभिये, समूहघोषचे उमेश बोरकर, अशोक नगरारे, शतम घरडे आदी उपस्थित होते.