आंबेकर अजूनही फरार
By Admin | Published: February 25, 2016 02:55 AM2016-02-25T02:55:53+5:302016-02-25T02:55:53+5:30
मकोकाचा गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटले तरी गँगस्टर संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
समन्वयाचा अभाव : ईडी-आयटीला दिली माहिती
नागपूर : मकोकाचा गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटले तरी गँगस्टर संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कारवाईची शक्यता लक्षात घेताच आंबेकर फरार झाल्याबाबत झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात समन्वयाचा अभाव राहिल्याचे कबूल केले.
बलकवडे म्हणाले, पोलीस ठाण्यातून रवाना झाल्यानंतर तो लगेच फरार झाला. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा दबाव असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले. आंबेकरला त्याची जागा लवकरच दाखविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आंबेकर आणि युवराज माथनकर यांच्या घर आणि कार्यालयाची झडती घेतली असता त्यात संपत्तीचे दस्तऐवज, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडले. यात दोघांनीही गुन्हेगारी पद्धतीने संपत्ती जमा केल्याचा संशय येतो. या कारणामुळे आयकर विभाग आणि प्रवर्तन निदेशालय (ईडी) यांना सुद्धा प्रकरणाची माहिती आणि दस्तऐवज देण्यात आले.
मकोकाच्या जुन्या प्रकरणात आंबेकर सुटल्याबाबत विचारले असता बलकवडे यांनी या प्रकरणाचे ठोस पुरावे गोळा करण्यात आल्याने आरोपी सुटण्याची शक्यता नाही. प्रत्येक कारवाईचे व्हीडिओ शुटींग केले जात आहे. संजय फातोडेची पोलीस कोठडी दोन दिवसासाठी वाढविण्यात आली. (प्रतिनिधी)
- ते दिल्ली पोलीसच
वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये चौकशीसाठी आलेले संदिग्ध व्यक्ती दिल्ली पोलीसच होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, यासंबंधी वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित झाल्यावर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत: पोलिसांशी संपर्क साधून आपल्या ओळखपत्राची एकेक प्रत पाठविली आहे. ते एका फसवणुकीच्या प्रकरणात आरोपीच्या शोधात येथे आले होते. या संबंधात दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडूनही रिपोर्ट मागवण्यात आले आहे. बलकवडे यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये आल्याबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला.