आंबेकरच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल
By admin | Published: October 31, 2015 03:16 AM2015-10-31T03:16:44+5:302015-10-31T03:16:44+5:30
५० हजारांच्या खंडणीसाठी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सनी वर्मा नामक गुंडाला लकडगंज पोलिसांनी अटक केली.
५० हजारांची मागणी : स्पॉट लावण्याची धमकी
नागपूर : ५० हजारांच्या खंडणीसाठी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सनी वर्मा नामक गुंडाला लकडगंज पोलिसांनी अटक केली. तो गँगस्टर संतोष आंबेकरचा साथीदार असून, त्याच्याच घरी राहातो, असे पोलीस सांगतात.
फिर्यादी अंकित नेमीचंद जैन (वय २६) मेहंदीबाग रोड, इतवारी येथे राहातात. ते स्पॉट - ९ रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आहेत.
आरोपी सनी वर्मा काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. येथे त्यावेळी सनीने हुक्का पिण्यासाठी वाद घातला. यावेळी ग्राहकाची मोठी गर्दी होती. त्यात आंबेकरचे नाव वापरून त्याने गोंधळ घातला आणि जैन यांच्याकडून १५ हजारांची खंडणी वसूल केली होती.
आंबेकरचा साथीदार म्हणून ओळख दाखविल्यामुळे जैन दडपणात आले होते. त्यामुळे नंतर वर्मा नेहमी जैन यांना धाक दाखवू लागला. फोनवर खंडणीची मागणी करू लागला. त्याला दाद न दिल्यामुळे गुरुवारी रात्री १० वाजता वर्मा जैन यांच्या घरी पोहचला. ‘ तू स्पॉट ९ रेस्टॉरंटमध्ये खूप कमाई केली.
मला ५० हजार रुपये दे अन्यथा तुझा स्पॉट लावेन‘, अशी धमकीही आरोपीने दिली. त्याच्याकडून धोका वाढल्याचे लक्षात आल्यामुळे जैन यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सनीची शोधाशोध केली. शुक्रवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.
आरोपी सनी वर्मा हा संतोषच्या टोळीचा सदस्य असून तो संतोषच्याच निकालस मंदिराजवळच्या घरी राहातो. संतोषचा ‘भांजा‘ म्हणून तो आपली ओळख दाखवतो आणि खंडणी वसूल करतो, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)