ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:21+5:302021-04-23T04:10:21+5:30
नागपूर : देशात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता टाेल नाक्यावर शुल्क अदा करण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय रस्ते परिवहन ...
नागपूर : देशात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता टाेल नाक्यावर शुल्क अदा करण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देत सवलत जाहीर केले आहे. या वाहनांसाठी येणाऱ्या ३० सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
केंद्र शासनाने माेटार वाहन अधिनियम १९८८ (५९) च्या धारा ६६ ची उपधारा (३) च्या खंड (ढ) द्वारे असलेल्या नियमांचे पालन करीत महामारीच्या काळात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत लागू केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी, मुख्यालयाकडून आलेल्या आदेशांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती दिली. विभागातील सर्व २५ टाेलनाक्यांवर अशा वाहनांकडून शुल्क घेण्यात येणार नाही. उल्लेखनीय म्हणजे नागपूरमध्ये वाढलेली गरज लक्षात घेत छत्तीसगडच्या भिलाई येथून ऑक्सिजन सिलिंडरची आयात केली जात आहे. या वाहनांना टाेल अदा करण्यासाठी नाक्यावर थांबावे लागत हाेते. मात्र, उशीरा का हाेईना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे.