खड्ड्यात अॅम्ब्युलन्स फसली अन् युवकाचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 07:54 PM2019-09-14T19:54:58+5:302019-09-14T19:56:41+5:30
एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. जागोजागी सिमेंटचे गुळगुळीत रस्ते बनत आहेत. मात्र या विकासाच्या प्रक्रियेत शहरालगत असलेल्या वस्त्या कोसोदूर आहे. लोकमतने बेसा-बेलतरोडी परिसरातील अशाच काही वस्त्यांवर यापूर्वी फोकस केला होता. घातपाताची शक्यताही वर्तविली होती. अन् अखेर घटना घडलीच. परिसरातील एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला. (काही कारणास्तव युवकाचे नाव देऊ शकत नाही.) ही घटना प्रशासनासाठी, लोकप्रतिनिधींसाठी नाकर्तेपणाची आहे. घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची असून, ती आता उजेडात आली.
मिहान प्रकल्पाचा गाजावाजा झाल्यानंतर अनेकांनी बेसा, बेलतरोडी या भागात निवासासाठी प्राथमिकता दर्शविली. त्यामुळे मनीषनगरपासून सोमलवाडा, बेलतरोडीपर्यंत नवीन नागपूर वसले. मोठमोठ्या फ्लॅट स्कीम, कॉलनी बिल्डरांनी बनविल्या. यातील काही कॉलनी शहरातील सीमेला लागून आहेत, त्यांचा समावेश ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. त्यामुळे या कॉलनी, सोसायट्यांमध्ये विकास कामे ना मनपा करीत आहे, ना ग्रामपंचायत. बेसा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या जयंतीनगरी-३ येथील रहिवाशांना याचा फटका बसत आहे. याच जयंतीनगरी-३ मध्ये तो युवक कुटुंबासह राहत होता. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. तेव्हा पाऊसही जोराचा होता. अॅम्ब्युलन्स रुग्णाला घेऊन रुग्णालयाकडे निघाली. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास प्रभूनगरातील गणपती मंदिराच्या समोरील खड्ड्यात ती अॅम्ब्युलन्स फसली. खड्ड्यातून अॅम्ब्युलन्स काढण्यासाठी अॅम्ब्युलन्समधील डॉक्टर, ड्रायव्हर आणि रुग्णासोबत असलेल्या महिलेचे प्रयत्न सुरू झाले. परंतु यश आले नाही. अखेर त्या महिलेने रात्री २ वाजता आजूबाजूच्या घरात जाऊन लोकांना उठविले. काही युवकांच्या मदतीने अॅम्ब्युलन्स खड्ड्यातून काढण्यात आली. पण यात अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ निघून गेला होता. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र तो युवक उपचाराला प्रतिसाद देऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. उपराजधानीत जिथे विकासाचा झपाटा सुरू आहे, तिथे खड्ड्यात अॅम्ब्युलन्स फसल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, ही शोकांतिका आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तो खड्डा परिसरातील नागरिकांनी बुजविला आहे.
हा प्रशासनाने केलेला मर्डर आहे
अॅम्ब्युलन्स फसणे, रुग्ण दगावणे या घटना दुर्गम भागात घडतात. आम्ही तर शहरात राहतोय. जिथे विकास आमच्या डोळ्यासमोर दिसतोय. आम्हीही हा विकास आमच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे कित्येकदा गळ घातली. पण कर्तव्यदक्ष प्रशासन आमच्याबाबतीत शून्य ठरले. हा मृत्यू अकस्मात नाही, तर प्रशासनाने केलेला तो मर्डर आहे.
वैशाली आसकर, घटनेच्या साक्षीदार, रहिवासी जयंतीनगरी - ३
सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे
आम्ही २०१३ पासून मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. वेळोवेळी ग्रा.पं.ला निवेदन, नगरसेवकांना भेटून तक्रारी केल्या. पालकमंत्र्यांपर्यंत आम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत. रस्ते तरी सुरळीत करा, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळेच आमच्या कॉलनीतील एका सहकाऱ्याचा बळी गेला.
राहुल राऊत, रहिवासी, जयंतीनगरी - ३