विमा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:17 AM2018-06-10T00:17:52+5:302018-06-10T00:18:04+5:30
कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा उदासीनपणा दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा उदासीनपणा दिसून येत आहे.
नागपूरचे कामगार रुग्णालय विदर्भातील कामगार रुग्णांसाठी एकमेव आधार आहे. या रुग्णालयात २०० खाटा आहेत. रोज बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ४५० ते ५०० रुग्णांवर उपचार होतात. रुग्णालयात आवश्यक सोयी व तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने बहुसंख्य गंभीर रुग्णांना तातडीने मेडिकलसह खासगी रुग्णलयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका होती. ही रुग्णवाहिका साधारण १० वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या निधीतून मिळाली होती. रुग्णांसाठी सोयीचे झाले होते. मात्र ३१ मे २०१८ रोजी या रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाला. त्यामुळे मागील १० दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबलेली आहेत. रुग्णालय प्रशासनाने चालकाची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन त्यापूर्वी कंत्राटी चालक नेमणे आवश्यक होते, परंतु वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाला स्वत:जवळील पैसे खर्चून ‘रेफर’ केलेल्या रुग्णालयात जावे लागत आहे. आधीच गरीब व सर्वसामान्य कामगार असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.