भविष्य घडविण्यासाठी अमरावतीला गेली होती अमिषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:27+5:302021-07-05T04:06:27+5:30

जगदीश जोशी नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या ...

Amisha had gone to Amravati to shape her future | भविष्य घडविण्यासाठी अमरावतीला गेली होती अमिषा

भविष्य घडविण्यासाठी अमरावतीला गेली होती अमिषा

googlenewsNext

जगदीश जोशी

नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीला घेऊन गेला होता. मुलीचे भविष्य घडविण्यासाठी आईवडिलांनीही स्वखुशीने अमिषाला मुलगी आणि जावयाकडे सोपविले होते. अमिषा मोठी झाल्यानंतर आलोकने नात्याला काळिमा फासला. शोषणासोबतच जीवनातही हस्तक्षेप केल्यामुळे अमिषा आलोकपासून फटकून वागत होती. त्यामुळे आलोकचा राग अनावर झाला. १५ दिवसापासून या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबीय आणि जवळच्या ४० जणांचे बयान नोंदविले आहेत.

२० जूनच्या रात्री ४५ वर्षीय आलोक मातूरकरने पत्नी विजया (४०), मुलगा साहिल (१२), मुलगी परी (१५), मेव्हणी अमिषा बोबडे (२१), सासू लक्ष्मी बोबडे (५५) यांचा खून करून गळफास घेतला होता. २१ जूनला सकाळी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बागल आखाडा परिसरात खळबळ उडाली होती. दाट लोकवस्तीत एवढी मोठी घटना झाल्यानंतरही शेजाऱ्यांना त्याची माहिती न मिळाल्यामुळे पोलिसही अवाक्‌ झाले होते. अमिषाच्या मोबाईलवर मिळालेल्या ऑडिओ क्लिपिंगमुळे या घटनेतील सत्यस्थिती बाहेर आली होती. आतापर्यंत तपासात आलोकची वासना आणि अमिषाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नरबळी घेतल्याची माहिती समोर येत आहे. आलोक आणि त्याची पत्नी विजया एका गारमेंट कारखान्यात काम करीत होते. आलोक पॅकिंग तर विजया प्रेस करीत होती. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्याने त्यांनी लग्न केले. त्यावेळी अमिषा केवळ ४ ते ५ वर्षांची होती. दोघेही तिला मुलगी समजून प्रेम करीत होते. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे अमिषा विजयाच्या खूप जवळ होती. व्यवसायामुळे आलोक-विजया आठ वर्षांपूर्वी अमरावतीला राहायला गेले. तेथे आलोकने अमरावतीच्या तळेगावमध्ये पत्नीच्या चुलत भावासोबत भागीदारीत गारमेंटचा कारखाना सुरू केला. त्यावेळी अमिषा आठवीत शिकत होती. चांगले शिक्षण देण्याच्या उद्देशाने दोघांनीही अमिषाला अमरावतीला नेले. तेथे नववीत तिला प्रवेश मिळवून दिला. अमिषाने ९ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले. तरुण झाल्यामुळे तिच्या इच्छा आणि खर्च वाढले. आलोक तिचा खर्च भागवीत होता. गारमेंटचा कारखाना चांगला चालत असल्यामुळे आलोकने पैशांची कमतरता भासू दिली नाही. दीड वर्षांपूर्वी अचानक कारखान्यात आग लागल्यामुळे आलोकवर संकट कोसळले. त्याला आर्थिक तंगी जाणवत होती. त्याचे अमिषासोबत खटके उडू लागले. कारखाना जळाल्यामुळे बँकेचे ७० लाखाचे कर्ज झाले. पैशासाठी बँक आणि इतर लोक दबाव टाकू लागले. आलोकला विम्याच्या रकमेचे १८ लाख रुपये मिळाले. त्या पैशातून विजयाच्या चुलत भावासोबत वाद झाला. नव्याने व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने आलोक नागपूरला परतला. लॉकडाऊनमुळे शिलाईचे कामही चांगले चालत नव्हते. आलोक व्यवसाय करण्याऐवजी अमिषाच्या जीवनात दखल देऊ लागला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात नेहमीच वाद होत होते.

...........

शुद्धीवर असताना केले खून

आलोकने शुद्धीत असताना नरसंहाराचे प्रकरण घडवून आणले आहे. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांना दोन दिवसापूर्वी अहवाल मिळाला. यात घटनेच्या वेळी आलोक नशेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याने खुनाच्या उद्देशाने कुटुंबीयांना कोणतेच गुंगीचे औषध दिले नसल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदन अहवालात पत्नी, मुलगी, मेव्हणी आणि सासूच्या गळ्यावर वार केल्याने आणि मुलीचा गळा आवळल्याची माहिती पुढे आली आहे.

मित्रांना सर्व माहीत होते

सूत्रानुसार अमिषाच्या जवळच्या मित्रांना तिच्या नात्याची माहिती होती. परंतु एवढी मोठी घटना घडेल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशीत अमिषाच्या काही मित्रांना विचारपूस केली असता, ते काहीच माहीत नसल्याचे सांगत आहेत. काही मित्र दहशतीत असल्यामुळे खूप प्रयत्न केल्यानंतर ते बयान देण्यासाठी तयार झाले. त्यांना पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील, अशी चिंता वाटत आहे.

................

Web Title: Amisha had gone to Amravati to shape her future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.