फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:16 PM2022-07-02T12:16:39+5:302022-07-02T12:17:03+5:30
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले.
नागपूर : राज्यात सत्ताबदलानंतर घडलेल्या राजकीय नाट्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. फडणवीस यांनी राज्यात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम दिल्लीतील भाजप नेत्यांनी केले असून, जाणूनबुजून त्यांचा ‘गेम’ केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे, फडणवीस समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लावले असून, त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो मात्र गायब आहे. यावरून चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले. माजी महापौर व फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांनी लावलेल्या होर्डिंग्जमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब आहे. याबाबत विचारणा केली असता पक्षाच्या प्रोटोकॉलनुसारच फोटो घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर प्रोटोकॉलनुसार फोटो घेतले आहेत.
शिंदेंच्या अभिनंदनाचे देखील ‘होर्डिंग्ज’
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांचे अभिनंदन करणारे ‘होर्डिंग’ किरण पांडव यांनी लावले आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व फडणवीस यांचेदेखील फोटो आहेत.
नागपुरात भाजपचे संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनरमध्ये मात्र शाह यांचा फोटो आहे.