अमित शहा आज नागपुरात

By admin | Published: May 16, 2015 02:39 AM2015-05-16T02:39:14+5:302015-05-16T02:39:14+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी नागपुरात येत असून ते संघ मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Amit Shah today in Nagpur | अमित शहा आज नागपुरात

अमित शहा आज नागपुरात

Next

सरसंघचालकांची घेणार भेट : तीन महिन्यांत तिसरा दौरा
नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी नागपुरात येत असून ते संघ मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत. तीन महिन्यांतील शहा यांचा हा तिसरा नागपूर दौरा राहणार आहे. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील संघ मुख्यालयात डॉ. भागवत यांच्याशी बंदद्वार चर्चा केली होती. लगेच शहा येत असल्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
अमित शहा यांचे शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन होईल. रविभवन येथे थोड्या वेळ थांबून सकाळी १०.३० च्या सुमारास ते संघ मुख्यालयात येतील. सरसंघचालकांनी त्यांना ११ ते १ ही भेटीची वेळ दिली आहे. या भेटीमध्ये केंद्र शासनाची वर्षपूर्ती, कॉंग्रेसची वाढती आक्रमकता, भूमी अधिग्रहण विधेयक या मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे केंद्र शासनावर काही दिवसांपासून ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टीका करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. केंद्र शासनाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये चांगली रहावी व जनतेत विश्वास कायम रहावा याबाबतदेखील सरसंघचालकांकडून ‘बौद्धिक’ दिले जाण्याची शक्यता आहे. शहा यांच्या कार्यक्रमपत्रिकेत उल्लेख नसला तरी या भेटीनंतर अमित शहा हे रेशीमबाग स्मृतिमंदिर येथेदेखील जाऊ शकतात. तेथे संघाचे तृतीय वर्ष शिबिर सुरू आहे. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास ते मुंबईकडे रवाना होतील.
अमित शहा यांनी मार्च महिन्यात दोनदा संघ मुख्यालय व स्मृतिमंदिर येथे हजेरी लावली होती.
धुळवडीच्या दिवशी तर सरसंघचालकांशी त्यांची ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली होती. त्यानंतर शहा संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेलादेखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भेटीमागे ‘अजेंडा’ काय?
भाजपामधील नेत्यांच्या बेलगाम वक्तव्यांमुळे केंद्र शासनावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. शिवाय गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्यांवरुन केंद्र शासनावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. अशा स्थितीत प्रथम देशाचे गृहमंत्री व आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसंघचालकांची भेट घेत असल्यामुळे यामागे नेमका ‘अजेंडा’ काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात होणाऱ्या काही फेरबदलांचे संकेत या भेटीमागून मिळत असल्याची चर्चा संघवर्तुळात आहे.
पर्रीकरदेखील येणार
दरम्यान, रविवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे नागपूरला येण्यार असल्याची माहिती आहे. संरक्षणमंत्री झाल्यानंतर पर्रीकर पहिल्यांदाच संघ मुख्यालयाला भेट देणार आहे. या भेटीत ते सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतील.

Web Title: Amit Shah today in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.