संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:50 AM2018-03-10T00:50:26+5:302018-03-10T00:50:46+5:30
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमित शहा यांनी रविवार ४ मार्च रोजी संघ मुख्यालयात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती. सभेच्या अगोदर शहा यांनी संघ पदाधिकाऱ्यांजवळ भाजपचे प्रतिनिधी म्हणून काही अपेक्षा व पुढील तीन वर्षांसाठीच्या योजनेचे प्रारुप यावेळी मांडले होते. त्रिपुरातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असल्याने ते सभेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते थेट रविभवनला रवाना झाले.
गडकरींनी घेतली संघ पदाधिकाऱ्यांची भेट
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सभास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शनिवारी सरकार्यवाहांची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
शहा-तोगडिया येणार आमनेसामने ?
गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हेदेखील सभेत सहभागी झाले आहेत. तोगडिया यांनी अप्रत्यक्षपणे शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शनिवारी अमित शहा व प्रवीण तोगडिया हे दोघेही सभेच्या निमित्ताने आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
एरवी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ‘व्हीव्हीआयपी’ व ‘व्हीआयपी’ पाहुण्यांची वर्दळ असते. परंतु अमित शहा येणार म्हणून विमानतळ ते रेशीमबागपर्यंतच्या रस्त्यांवर जागोजागी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता. रेशीमबाग मैदान परिसरातदेखील प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मैदानावरदेखील सुरक्षा व्यवस्था होती. परंतु रविभवनकडे शहा गेल्याची माहिती कळताच सुरक्षा काहीशी शिथिल करण्यात आली.