भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
By योगेश पांडे | Published: September 24, 2024 11:48 PM2024-09-24T23:48:06+5:302024-09-24T23:50:09+5:30
गावपातळीवर आजी-माजी सरपंचांना पक्षासोबत जोडण्याची सूचना
नागपूर : राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत भाजप पदाधिकाऱ्यांना ‘इलेक्शन मोड’वर आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात दहा सूत्री कार्यक्रमच मांडला. प्रत्येक बुथवर केवळ २० किंवा ३० मते वाढवून काहीच होणार नाही. प्रत्येक बुथवरील मतांमध्ये कमीत कमी १० टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे, असे शाह यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्यामुळे कार्यकर्ते निराश झाले आहेत. मात्र, ही निराशा झटकून कामाला लागण्याची आवश्यकता आहे. राज्यात सत्तेसाठी विदर्भात भाजपचा एकाधिकार असला पाहिजे. मात्र, केवळ उत्साह असून, विजय मिळविता येत नाही. त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी मायक्रो नियोजनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन शाह यांनी केले.
...तर तो नॅरेटिव्ह नेहमीसाठी डोकेदुखी बनेल
लोकसभेत विरोधकांनी आरक्षणावरून नॅरेटिव्ह जनतेत पसरविले व त्याचा फटका भाजपला बसला. तळागाळात जाऊन हा नॅरेटिव्ह खोडून काढण्याची आवश्यकता आहे. जर हा नॅरेटिव्ह भाजपच्या नावासोबत चिपकून राहिला, तर तो पुढील अनेक निवडणुकींमध्ये डोकेदुखी बनेल, याकडे शाह यांनी लक्ष वेधले.
अमित शाहांनी दिलेली १० सूत्रे
- ‘अ’ श्रेणीच्या बुथवर १० टक्के मतदान वाढवा आणि उर्वरीत बुथवर १० टक्के मते वाढवा.
- विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथपर्यंत ११ मोटारसायकलवरून एक तासाचा फेरफटका.
- शेतकऱ्यांना भेटून त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती द्या.
- ऋषी-मुनींचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.
- पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेकडे लक्ष देत सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडा.
- पराभूत सरपंचांना पक्षात सामावून घ्या.
- बुथ, मंडळ, प्रदेश पातळीवरील कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडा.
- जेथे पक्ष कमकुवत आहे, तेथे शक्तीकेंद्र स्थापन करा.
- बुथ पातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा.
- बचतगट व स्वयंसहायता गटांच्या बैठका घ्या.
-बैठकीला गडकरींची अनुपस्थिती
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित नव्हते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गडकरी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शाह यांना त्यांचा निरोप दिला.