नियमभंग करून स्फोटके कंपनीला जमीन देणार नाही
By admin | Published: December 18, 2014 02:58 AM2014-12-18T02:58:12+5:302014-12-18T02:58:12+5:30
कोंढाळी व कळमेश्वर परिसरातील स्फोटके निर्मिती कंपनीला नियमाचा भंग करून वनजमीन देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिले.
नागपूर : कोंढाळी व कळमेश्वर परिसरातील स्फोटके निर्मिती कंपनीला नियमाचा भंग करून वनजमीन देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिले.
मात्र त्याच वेळी या कारखान्यातून तयार होणारी सामुग्री संरक्षण खात्याला पुरवठा केली जाणार असल्याने याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काटोल तालुक्यातील चाकडोह येथे सोलर इंडस्ट्रिज इंडिया लि. या स्फोटके निर्मिती कारखान्याच्या विस्तारासाठी व्याघ्र प्रकल्पाची २२२ एकर जमीन वळती करण्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. या भागात वाघाचे अस्तित्व आढळून येत असल्याचा दावाही त्यांनी केला.
वनजमीन वळती करण्याचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे आला नाही. प्रधान वनसंरक्षक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नियमांच्या अधीन राहूनच याबाबत विचार केला जाईल. नियमभंग करून जमीन दिली जाणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या भागात वाघाचे अस्तित्व नाही. तसे पुरावे आढळल्यास तर त्याचा तपास करू, असेही ते म्हणाले. याबाबत जोगेंद्र कवाडे यांनीही उपप्रश्न केला. (प्रतिनिधी)