मी कुठेही गेलेलो नाही.. अमोल काळे आले समोर.. दिलं स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 02:39 PM2022-02-17T14:39:49+5:302022-02-17T15:04:17+5:30
अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याची चर्चा होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात ट्विट करून भाष्य केले होते. यानंतर आता अमोल काळेनी स्पष्टीकरण दिलं असून आपण कुठेही गेलो नसल्याचे म्हटले आहे.
नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात त्यांनी अमोल काळे व विजय ढवंगाळे हे मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून अमोल काळे व विजय ढवंगाळे यांचे नाव चर्चेत होते.
यापैकी अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याचीही चर्चा होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात ट्विट करून भाष्य केले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे आमेल काळे ? असा प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केला होता. यानंतर आता अमोल काळेंनी स्पष्टीकरण दिलं असून आपण कुठेही गेलो नसल्याचे म्हटले आहे.
याबाबत काळेंनी एक जाहीर निवेदन देत आपली बाजू मांडली आहे. मी एक खासगी व्यावसायिक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस तसेच समाजमाध्यमांवर काही नेत्यांचे माझ्यासंदर्भातील वक्तव्ये पाहण्यात/वाचण्यात आली. ही सारी वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचे कुठलेही कंत्राट मी घेतलेले नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद आहेत. असे असतानासुद्धा केवळ संभम्र निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्सर बदनामी जे नेते करताहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे काळे यांनी म्हटलं आहे.