५.५ लाख पंप धारकांकडे ११०० कोटींची थकबाकी
By admin | Published: August 6, 2014 01:11 AM2014-08-06T01:11:21+5:302014-08-06T01:11:21+5:30
महावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे
व्याज होणार माफ : कृषी संजीवनी योजनेत ६०० कोटींची ‘संजीवनी’
सुरेश सवळे -चांदूरबाजार
महावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार असल्याचे लाभार्थीच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.
शासनाने ही योजना पुनर्जीवित केली आहे. या योजनेचा लाभ महावितरण कंपनीच्या अकोला विभागांतर्गत अमरावती परिमंडळातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच पूर्व-पश्चिम विदर्भातील सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यात सर्वदूर ही योजना राबविण्यात आली. तथापि, योजनेचा लाभ कृषी पंपधारकांनी घेतला नाही. या योजनेत वीज देयकावर असणाऱ्या कृषी पंपधारकाचे व्याज माफ होणार होते. आता पुन्हा शेतकऱ्यांना संजीवनी देणारा निर्णय शासनाने घेतला. यावेळी मूळ वीज देयक अर्धेच असून अर्धी रकम व्याजदराची आहे. या योजनेत कृषी पंपधारकांना ६०० कोटींची संजीवनी मिळणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०१४ रोजीच्या थकबाकीतील मूळ रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व पूर्ण थकबाकीच्या रकमेवरील १०० टक्के व्याज व दंड माफ होणार आहे. ३१ मार्च रोजी ज्या शेतकऱ्यांकडे कृषीपंपाची कुठलीही थकबाकी नाही त्यांना पुढील दोन त्रैमासिक अर्थात सहा महिन्यांच्या वीज देयकात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तीन हप्त्यात शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहेत. त्यापैकी पहिला हप्ता किमान २० टक्के ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत, दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत आणि उरलेली रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत भरावयाची आहे. ५० टक्के थकबाकीची रक्कम एकरकमीसुुद्धा भरता येऊ शकते.
सध्या जे रोहीत्र नादुरूस्त असतील ते ८० टक्के रक्कम भरल्यानंतर बदलले जातात, मात्र आता ८० टक्क्यांची अट शिथील करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार फक्त देयक न भरलेल्या शेतकऱ्यांचाच वैयक्तिक वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या योजनेत थकबाकीदार कृषी पंपधारकासोबत नियमित देयके अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.