खारपाण क्षेत्रात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:36 PM2019-03-14T21:36:51+5:302019-03-14T21:43:08+5:30
अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.
जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. व्ही.एल, गुप्ता व सोसायटीचे सचिव डॉ. मनीष बलवानी उपस्थित होते.
डॉ. उखळकर म्हणाले, पनामा देशातील उस कामगारांमध्ये, श्रीलंकेमधील काही भागात, या शिवाय अमरावती, पुसद, दिग्रस, घाटंजी, नांदेड, बुलडाण्यातही मधुमेह व रक्तदाब नसताना मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण आढळून येतात. विशेषत: बंजारा समाजात याचे प्रमाण मोठे आहे. विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी होत असलेला वापर हेही एक यामागील कारण असावे. यातील बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. अनेकांना डायलिसीससारखे खर्चिक उपचार झेपत नसल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे.
खंडाळामध्ये दर तिसऱ्या घरात रुग्ण
आकोट तालुक्यातील खंडाळा गावात दर तिसऱ्या घरात मूत्रपिंडाचा रुग्ण आढळून येत आहे. उन्हाळ्यात या विकाराच्या रुग्णांत वाढ होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या मूत्रपिंड विकाराच्या १०० रुग्णांमध्ये २५ रुग्ण हे मूत्रपिंड निकामी होण्याच्या टप्प्यात आलेले असतात.
कीटकनाशकाचा अतिवापर
डॉ. चौबे म्हणाले, कीटकनाशकाचा अतिवापरामुळे प्रदूषित झालेली पिके, जमीन, हवा व पाण्यामुळेही मूत्रपिंडाचे विकार वाढल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे, विहिरी व बोअरवेलचे पाणी खूप खोल गेले आहे. ढोबळमानाने या पाण्याची तपासणी होते. यामुळे विषारी क्षाराची नोंदणीच होत नाही. विकाराला हेही एक कारण आहे.
२०४०पर्यंत मूत्रपिंडाचे विकार पाचव्या क्रमांकावर
मूत्रपिंड विकारामुळे येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१६ मध्ये अकराव्या स्थानी होते. शासनाने याला गंभीरतेने न घेतल्यास २०४०पर्यंत हे प्रमाण पाचव्या क्रमांकावर जाऊ शकते. जागतिक किडनी कौन्सिलने संयुक्त राष्ट्रसंघात (यूनो) ही बाब मांडली आहे.