कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:23+5:302021-05-10T04:08:23+5:30
नागपूर : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात जनता प्रचंड नैराश्यात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखी स्थिती आहे. लाखो रुपयांचा खर्च ...
नागपूर : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात जनता प्रचंड नैराश्यात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखी स्थिती आहे. लाखो रुपयांचा खर्च आणि मनात भयगंड अशा स्थितीमध्ये कोरोनावर प्राणायामाची मात्रा अत्यंत उपयुक्त असल्याचे मत योग अभ्यासक आणि योग प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळामध्ये व्यायाम, योग, प्राणायाम याकडे अनेकांचा कल वाढला आहे. कधी नव्हे ती मंडळीही सकाळी नियमित व्यायाम आणि योग करताना दिसत आहे. कोरोनाच्या काळामध्ये भारतातील योगविद्या आणि प्राणायामाचे महत्त्व लोकांना पटायला लागल्याचे एकूण स्थितीवरून दिसत आहे. कपालभाती, अनुलोम विलोम, भस्रिका या मुख्य प्राणायामासोबतच उजैयी प्राणायाम, भ्रामरी, उद्गित, प्रणव हे प्रकारही महत्त्वाचे मानले जात आहेत. रुग्णालयामधून सुटी झाल्यावर डॉक्टर मंडळीसुद्धा फिरण्याचा आणि व्यायामाचा सल्ला देतात, यामागील कारण शारीरिक क्षमता वाढविणे हेच असते.
....
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
१. सध्याच्या कोरोना संकटकाळात ऑक्सिजनची पातळी कायम राखणे आणि रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भस्रिका प्राणायामामुळे शरिरातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. सर्वांनी तो सतत करत राहिल्यास फायदा होतो. हा व्यायाम केव्हाही करता येतो.
२. सकाळी लवकर उठण्याची सवय शरीराला लागते. यामुळे आहार, विहार उत्तम राहतो. खानपानही नियंत्रणात राहून आयुष्याला चांगले वळण लागते. कपालभाती, अनुलोम विलोम केल्याने चेहऱ्याचे तेज वाढते, ओज वाढते.
३. नियमित व्यायामामुळे संपूर्ण शरीर अनेक वर्षे चांगले आणि सुदृढ राहते. किडनी, हार्ट, लिव्हर मजबूत होते. लवकर थकवा येत नाही. दिवसभर मन प्रसन्न राहते. शरीरात उत्साह कायम भरून राहतो. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लागते. यामुळे कौटुंबिक वातावरणही चांगले राहते.
....
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात....
योग, प्राणायाम आणि व्यायाम या तिन्ही बाबी मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्राणायामाचा संबंध मनाशी आहे. व्यायामाचा संबंध शरीराशी आहे, तर योगाचा संबंध शारीरिक आंतरक्रियेशी आहे. कोरोना काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे आवर्जून करायलाच हवे.
- विठ्ठलराव जीभकाटे, ज्येष्ठ योगतज्ज्ञ
...
आयुष्य वाढवायचे असेल आणि निरोगी जगायचे असले तर सर्वांनी योग, प्राणायामाची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे शरीराला कोणताच अपाय नाही, उलट फायदाच आहे. भारतीय योगशास्त्र महान आहे. व्याधी, रोगनिवारणाची शक्ती यात असून ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
- योगरत्न माया हाडे, पश्चिम नागपूर पतंजली प्रमुख
...
नियमित योग करणारे म्हणतात
कोरोना संक्रणाला परतवून लावण्यासाठी योग-प्राणायाम उत्तम शस्त्र आहे. मला स्वत:ला संसर्ग झाला होता, मात्र १५ वर्षांच्या नियमित योग प्राणायामामुळे कोणताही त्रास झाला नाही. मागील कितीतरी वर्षात मला ताप आलेला नाही.
- माधुरी ठाकरे, नागपूर
...
मागील १५ वर्षांपासून मी नियमित योग, प्राणायाम करतो. यामुळे माझी दिनचर्या बदलली. स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती वाढली. शारीरीक क्षमताही वाढली आहे. डाॅक्टरांकडे जाण्याचा खर्च वाचला आहे.
- प्रदीप काटेकर, नागपूर
...