तिकीट रद्द करून भामट्याने पळविली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:48 AM2020-09-15T00:48:41+5:302020-09-15T00:50:10+5:30
प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावयाची बतावणी करून एका भामट्याने माहिती घेऊन कन्फर्म तिकीट रद्द केले. तिकिटाची रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावयाची बतावणी करून एका भामट्याने माहिती घेऊन कन्फर्म तिकीट रद्द केले. तिकिटाची रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
तात्या बेहरू बाबर (४५), शोभा तात्या बाबर (४०), नबी शिवनाथ शेगर (६०) आणि रेशमा प्रताप शिंदे (३०) सर्वजण रा. नांदगाव पेठ जि. अमरावती हे नागपूरवरून नवी दिल्लीला जात होते. त्यांच्याजवळ कन्फर्म तिकीट होते. दुपारी ३ वाजता त्यांची गाडी होती. ते रेल्वेस्थानकाच्या आत जाणार तेवढ्यात एक भामटा त्यांच्या जवळ आला. प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावी लागते अशी बतावणी त्याने केली. प्रवाशांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आपले कन्फर्म तिकीट त्याच्याजवळ दिले. त्याने सर्वांची नावे व इतर माहिती आरक्षणाच्या फॉर्मवर टाकली. तिकीट रद्द करून त्याने पैसे आपल्या खिशात टाकले आणि रद्द केलेले तिकीट या प्रवाशांच्या हातावर ठेवून तो पसार झाला. रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करताना त्यांना हे तिकीट रद्द करण्यात आल्याचे समजले. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आढळला नाही. फसवणूक झालेल्या प्रवाशांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आणि ते निघून गेल्यामुळे लोहमार्ग पोलिसांचा नाईलाज झाला.