अमरावतीच्या मुलाचे नागपुरात अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:27 AM2018-06-16T00:27:37+5:302018-06-16T00:31:37+5:30
एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण मुलगा ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले, तर दोघांना दृष्टी. विशेष म्हणजे, हा निर्णय अमरावती येथे शेतकरी असलेल्या त्या मुलाच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण मुलगा ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले, तर दोघांना दृष्टी. विशेष म्हणजे, हा निर्णय अमरावती येथे शेतकरी असलेल्या त्या मुलाच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी घेतला.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील रहिवासी प्रणव सुनील अंधारे (१६) त्या मेंदू मृत (ब्रेन डेड) मुलाचे नाव.
शेतकरी असलेले सुनील अंधारे यांचा मुलगा प्रणवला दहावीत ७० टक्के गुण मिळाले. भविष्याचे स्वप्न रंगवित असतानाच प्रणववर काळाने झडप घातली. तो कामानिमित्त दुचाकीने डोंगरयावली येथे त्याचा मित्र अतुल चौधरीसोबत गेला. तेथून परत येत असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक दिली. यात प्रणवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मोर्शीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर प्रकृती पाहता, त्याला अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रणवचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याचा मेंदू मृत झाला होता. तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूने अंधारे कुटुंबावर दु:ख कोसळले. त्या प्रसंगातही डॉक्टरांनी त्यांना अवयवदानाची कल्पना दिली. प्रणवचे वडील व कुटुंबीयांनी होकार दिला. त्यानुसार झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना याची माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. शुक्रवारी दुपारी अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. दोन मूत्रपिंड, यकृत व नेत्र दान करण्यात आले.
न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये चौथे यकृत प्रत्यारोपण
लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये प्रणवचे यकृत दाखल होताच एका पुरुष रुग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. या हॉस्पिटलमधील हे चौथे तर नागपुरातील पाचवे यकृत प्रत्यारोपण होते. येथील प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात प्रत्यारोपण करण्यात आले. मूत्रपिंड खामला येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटल व शंकरनगर चौकातील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या रुग्णाला देण्यात आले. तर दोन्ही बुबूळ अमरावती येथील नेत्रपेढीला देण्यात आले.
‘हृदय’ प्रत्यारोपणासाठी पडला कमी वेळ
प्रणवच्या कुटुंबीयांनी हृदयदानाचाही निर्णय घेतला होता. परंतु राज्यात संबंधित रक्तगटाचा रुग्ण उपलब्ध नव्हता. राज्याबाहेर चेन्नई येथे रुग्ण होता. परंतु अमरावती येथून नागपूर विमानतळ आणि तेथून चेन्नई गाठणे तेही चार तासांच्या आत शक्य नसल्याने हृदयदानाचा निर्णय मागे घेण्यात आला.
अमरावती ते नागपूर पाचव्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’
यकृत व दोन मूत्रपिंडासाठी अमरावती ते नागपूर पाचव्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आले. यात सहायक पोलीस आयुक्त (ग्रामीण) जमील अहदम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अब्बाराव मेंढे, सहायक फौजदार अशोक तिवारी, जोशी, नितीन डुब्बलवार, प्रवीण गारकल, प्रफुल्ल बंगाडे व सरस्वती कोंडवते यांनी सहकार्य केले. तर शहरात अवयवाची रुग्णवाहिका सहायक फौजदार सुरेंद्र ठाकूर, जनार्दन काळे व अनिल परमार यांच्या नेतृत्वात त्या-त्या रुग्णालयात पोहचविण्यात आली.