अमरावती येथील कोट्यवधीच्या जमिनीचा लंडनमध्ये सौदा

By admin | Published: October 16, 2016 02:48 AM2016-10-16T02:48:24+5:302016-10-16T02:48:24+5:30

अमरावती येथील कोट्यवधीची जमीन हडपण्यासाठी नागपुरातील एका नोटरीच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून लंडन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

Amravati land deal in London | अमरावती येथील कोट्यवधीच्या जमिनीचा लंडनमध्ये सौदा

अमरावती येथील कोट्यवधीच्या जमिनीचा लंडनमध्ये सौदा

Next

नागपूरच्या नोटरीच्या बनावट सह्या :
बनवाबनवीबाबत हायकोर्टाने मागितला अहवाल

नागपूर : अमरावती येथील कोट्यवधीची जमीन हडपण्यासाठी नागपुरातील एका नोटरीच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून लंडन येथे सामंजस्य करार करण्यात आला. या संदर्भात दाखल वेगवेगळ्या चार फौजदारी रिट याचिका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने एकत्र करून सुनावणीस घेतल्या आहेत. न्यायालयाने सदर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून एका आठवड्यात या बनवाबनवी संदर्भात विस्तृत अहवाल मागविला आहे.
खुद्द नोटरी अ‍ॅड. ब्रिजेस प्रसाद यांच्यामार्फत अ‍ॅड. वंदन गडकरी यांनी या बनवाबनवीबाबत याचिका दाखल केली. याचिकेनुसार २ जानेवारी २०१३ रोजी लंडन येथे प्रतापसिंग पांडुरंग बनारसे व इतर पाच तसेच सोमलवाडा येथील चंद्रशेखर बळीराम हाडके यांच्यात अमरावती येथील चार एकर जागेच्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. करारावर त्यांच्या बनावट सह्या, शिक्के मारून पंजीयन क्रमांक नमूद करण्यात आला. त्यांनी याचिकेत असेही नमूद केले की, या बनवाबनवीबाबत आपणास समजताच सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने ही याचिका दाखल केली.
अन्य एक याचिका वामन भगवान जाधव यांनी अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांच्या मार्फत दाखल केली. जाधव हे चंद्रशेखर हाडके यांच्यासोबत काम करीत होते. या दरम्यान चंद्रशेखर हाडके , प्रतापसिंग बनारसी आणि इतरांनी हा खोटा सामंजस्य करार तयार केला. त्यावर अमरावती येथील शेषराव गोयटे यांच्या बनावट सह्या साक्षीदार व संमतीदार म्हणून केल्या. त्याच प्रमाणे अनेक कागदपत्रांवर गोयटे यांच्या बनावट सह्या केल्या. ही कागदपत्रे सरकारी कार्यालयात वापरण्याकरिता अधिकाऱ्यांना लाच दिली. त्याच प्रमाणे अनेक व्यक्तींच्या नावे बनावट देयके तयार करून त्यांचा उपयोग सदर येथील आयकर कार्यालयात केला. यात वामन जाधव यांच्या नावे ४० लाख रुपये दाखवण्यात आले. आयकर विभागाकडून नोटीस मिळताच जाधव यांनी विस्तृत तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल केली. यावर कारवाई न झाल्याने ही रिट याचिका दाखल केल्याचे जाधव यांनी याचिकेत नमूद केले.
अन्य एक याचिका चंद्रशेखर हाडके यांनी अ‍ॅड. आकाश मून यांच्यामार्फत दाखल केली. याचिकेत असे नमूद करण्यात आले की, याचिकाकर्ते हाडके हे सामंजस्य कराराच्या आधारे अमरावती येथील जागेचा ताबा घेण्यास गेले होते. येथील गोयटे कुटुंबीयांनी हल्ल्याचा आणि एका मुलीच्या विनयभंगाचा आरोप करून खोटी तक्रार केली. ही तक्रार रद्दबातल ठरवण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. यावर संबंधित मुलीला न्यायालयाची नोटीस प्राप्त होताच तिने अ‍ॅड. सतीश उके यांच्यामार्फत उत्तर दाखल केले. तिने सामंजस्य कराराचे बनावटीकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.यासाठी तिने पुरावेही सादर केले. आपले वडील आयुष्यात कधीही लंडन येथे गेले नाही, असे सांगून तिने वडिलाचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. अ‍ॅड. उके यांनी बनावट सामंजस्य कराराची प्रत सादर करण्यासाठी निर्देश देण्यात यावे, अशी न्यायालयाला विनंती केली. यावर हाडके यांनी शपथपत्र दाखल करून कराराची प्रत रिलायन्स कंपनीच्या ताब्यात असल्याचे सांगितले. ही प्रत रिलायन्सच्या ताब्यात नसल्याचे शपथपत्र अ‍ॅड. उके यांनी सादर केले.
न्यायालयाने जाधव यांच्या याचिकेत सदर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. एक आठवड्यानंतर पुन्हा हे प्रकरण सुनावणीस येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Amravati land deal in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.