समलैंगिकतेच्या तणावातून १८ वर्षीय ‘लेस्बियन’ विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 09:21 PM2023-05-08T21:21:42+5:302023-05-08T21:24:23+5:30
Nagpur News समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून चर्चांचे रान उठले असताना याच मुद्द्यावरून शहरातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
नागपूर : समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून चर्चांचे रान उठले असताना याच मुद्द्यावरून शहरातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिच्या समलैंगिकतेला कुटुंबीयांचा विरोध होता व त्याच तणावातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या सुसाइड नोटमधून हा खुलासा झाला असून पोलिसांनादेखील हादरा बसला आहे.
संबंधित १८ वर्षीय मुलगी एका नामांकित महाविद्यालयात बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तिचे वडील केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत असून ते मूळचे उत्तर भारतातील आहेत. ती आई-वडील व लहान भावासोबत काटोल मार्गावरील कॉलनीत राहायची. तिचा कल समलैंगिकतेकडे होता व तिने तशी घरच्यांना कल्पनादेखील दिली होती. ही बाब ऐकून घरच्यांना हादरा बसला होता व त्यांनी विरोध केला होता. यामुळे घरात वाददेखील झाले होते व विद्यार्थिनी तणावातच असायची. रविवारी दुपारी तिचे आईवडील व भाऊ बाहेर गेले होते. तिने सिलिंग फॅनला नायलाॅन दोरीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी तिला तातडीने मेयो इस्पितळात नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
आत्महत्या करण्याअगोदर तिने सुसाइड नोट लिहिली होती. लेस्बियन असल्याने तिचे कुटुंबीय तसेच समाज तिला विरोध करत आहे. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने ती हे कठोर पाऊल उचलत असल्याचे तिने त्यात म्हटले आहे. तिने चिठ्ठीत आपल्या कृत्याबद्दल तिच्या पालकांची माफीदेखील मागितली. सोमवारी तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह अंतिम संस्कारासाठी त्यांच्या गावी घेऊन गेलेल्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
लग्नासाठी सुरू होता शोध
मुलीने लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार तिचे आईवडील लग्नासाठी मुलगा शोधत होते. मात्र, तिचा कल समलैंगिकतेकडे असल्याने त्या मुलाशी नीट संसार करता आला नसता व तोदेखील कधीच सुखी झाला नसता असे तिने लिहिले आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक विठोले यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.