कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:40 AM2022-03-30T10:40:38+5:302022-03-30T10:48:18+5:30
डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे.
नागपूर : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधन दर, गॅसवाढ होत असल्याने घराघरांत या विषयावरून चर्चा वाढल्या आहेत. एका वकिलानेन्यायालय आवारातील कँटीनमधील समोसा महागल्याच्या कारणावरून चक्क राजीनामाच देऊन टाकला. त्यांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अॅड धर्मराज बोगाटी यांनी आपल्या राजीनाम्यात, डिबीएतर्फे चालवण्यात येणाऱ्या कँटिनमध्ये खाद्यपदार्थांचे दर मर्यादेपलिकडील असल्याचे नमूद केले आहे. या कँटिनमधील एक प्लेट समोस्याची किंमत ३० रुपये असून बाहेरच्या तुलनेत येथील दर जास्त असल्याचा आरोपही बोगाडे यांनी केला आहे.
खरतर, डीबीएच्या कँटिनने वकिलांना वाजवी किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यायला हवेत. परंतु, डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे. समोसा महागल्यावरून राजीनाम्याची ही घटना नागपुरात चर्चेत आहे.
इतर विषय नाहीत का?
गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून हॉटेलमधील खाद्यपदार्थही महागलेत. जिल्हा न्यायालयातील कँटिनमधील समोस्याच्या किमतीतही वाढ करण्यात आली. पण, समोस्याच्या किंमतीवरून कुणी राजीनामा देत असेल तर जिल्हा न्यायालयात इतर दुसरे मुद्देच उरले नाहीत, असेच म्हणाले लागेल अशी प्रतिक्रिया जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड कमल सतुजा यांनी दिली. ॲड. बोगाटी यांच्या राजीनाम्याचा विचार करू, असेही त्या म्हणाल्या