नागपुरातून पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल, गडकरींचा पूरक उमेदवार असल्याचा दावा

By योगेश पांडे | Published: March 20, 2024 08:26 PM2024-03-20T20:26:30+5:302024-03-20T20:26:46+5:30

अर्ज मागे घेणार नसल्याची भूमिका : भाजपकडून कुठलीही सूचना नाही

An application was filed from Nagpur on the first day claiming to be Gadkaris supplementary candidate | नागपुरातून पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल, गडकरींचा पूरक उमेदवार असल्याचा दावा

नागपुरातून पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल, गडकरींचा पूरक उमेदवार असल्याचा दावा

नागपूर : नागपूरसह पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल व्हायला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपुरातून एक अर्ज दाखल करण्यात आला. संबंधित उमेदवाराने भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचा पूरक उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचा दावा केला आहे. मात्र याबाबत ना भाजपकडून निर्देश देण्यात आले आहेत ना गडकरी यांच्याकडून काही सूचना आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अर्ज परत घेणार नसल्याची भूमिकादेखील संबंधित उमेदवाराने मांडली आहे. त्यामुळे या अर्ज दाखल करण्यामागे नेमके गणित काय आहे याचे कोडे निर्माण झाले आहे.

व्यंकटेश्वरा स्वामी उर्फ दीपक कटकधोंड असे संबंधित उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गडकरी यांचा पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याचे सांगितले. ते मुळचे कर्नाटकमधील असून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात त्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा अर्ज दाखल करताना त्रुटी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे पूरक उमेदवार अर्ज भरत असतात व नंतर ते अर्जदेखील मागे घेतात. नितीन गडकरी हे अर्ज कधी दाखल करणार याची तारीख निश्चित झालेली नाही. मी गडकरी यांचा पूरक उमेदवार म्हणून अर्ज केला असला तरी प्रचार त्यांच्यासाठीच करेन. त्यांच्या कामाने प्रभावित झाल्याने मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजप किंवा गडकरी यांना याबाबत त्यांना पावले उचलण्याची सूचना केली का अशी विचारणा केली असता त्याचे ठोस उत्तर त्यांच्याकडे नव्हते.

विशेष म्हणजे गडकरी यांचा अर्ज वैध ठरल्यावरदेखील आपला अर्ज मागे घेणार नसल्याचा दावा व्यंकटेश्वरा स्वामी यांनी केला आहे. याअगोदर त्यांनी २०१९ साली सोलापूरमधूनदेखील निवडणूक लढविली होती. यंदादेखील ते सोलापूरमधून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या दिवशी आलेल्या या एकमेव अर्जामुळे सोशल माध्यमांवर विविध चर्चा सुरू होत्या.

Web Title: An application was filed from Nagpur on the first day claiming to be Gadkaris supplementary candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर