डॉक्टर महिलेचा आंघोळ करताना व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न; संशयित निवासी डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
By सुमेध वाघमार | Published: July 15, 2023 05:49 PM2023-07-15T17:49:21+5:302023-07-15T17:49:39+5:30
मेडिकलच्या मार्ड वसतिगृहातील प्रकरण
नागपूर : निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या ‘मार्ड’ वसतिगृहात आंघोळ करीत असलेल्या एका डॉक्टर महिलेचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करणाºया निवासी डॉक्टरला पकडून पोलिसांच्या हवाली केले. मेडिकल प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली आहे.
निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ वसगितृहात महिला आणि पुरुष दोघांचीही निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली एक महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली. वसतिगृहातील प्रसाधनगृहातील दरवाजे खालून तुटलेले आहेत. एक निवासी डॉक्टर तुटलेल्या दरवाजातून मोबाईलने व्हिडीओ शुटिंग करीत असल्याचे महिला डॉक्टरला आढळून आले. त्यांनी आरडाओरड केली. त्या दरम्यान निवासी डॉक्टर पळून गेला. शुक्रवारी दुपारनंतर त्या महिला निवासी डॉक्टरने अधिष्ठाता कार्यालयात तक्रार केली.
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी तातडीने वसितगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. संशयित निवासी डॉक्टरच्या मोबाईलची झडती घेतली असता, त्याचा मोबाईलमध्ये कोणताही व्हिडीओ किंवा फोटो आढळून आला नाही. या प्रकरणाची अधिक चौकशीसाठी डॉ. गजभिये यांनी सहा सदस्यांची चौकशी समिती नेमली. यात उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उद्य नारलावार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष ठाकरे व डॉ. जयेश मुखी यांचा समावेश आहे.
- वॉर्डनचे वसतिगृहाकडे दुर्लक्षच
काही निवासी डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले, वॉर्डन डॉ. गौर हे वसतिगृहात येत नाही. येथील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. वसतिगृहातील महिला आणि पुरुषांच्या प्रसाधनगृहातील दरवाजे खालून तुटलेले आहेत. दुरुस्तीसाठी वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात नाही. वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजकडे व सुरक्षेकडेही कोणाचे लक्ष नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.