भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 03:04 PM2022-01-21T15:04:00+5:302022-01-21T15:14:23+5:30

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास राज्यामध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

An average of 838 complaints are lodged against corrupt public servants every year | भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी

भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी

googlenewsNext
ठळक मुद्देभ्रष्टाचार प्रतिबंध कायदा नागरिकांसाठी प्रभावी शस्त्र

राकेश घानोडे

नागपूर : राज्यातील नागरिकांसाठी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा प्रभावी शस्त्र ठरत आहे. पीडितांनी या कायद्याच्या आधारे आतापर्यंत असंख्य भ्रष्ट लोकसेवकांना धडा शिकविला आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास राज्यामध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

कायदे व नियमांद्वारे ठरवून देण्यात आलेल्या सेवा नागरिकांना देणे लोकसेवकाचे कर्तव्य आहे. कर्तव्य बजावण्यासाठी ते कोणत्याही लाभाची मागणी करू शकत नाही, असे असले तरी अनेक लोकसेवक चिरीमिरीसाठी नागरिकांची कामे अडवून ठेवतात. अशा प्रवृत्तीला कायमचे संपविण्यासाठी देशात हा कायदा लागू करण्यात आला आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांना पुढेही या कायद्याचा व्यापक उपयोग करीत राहावे लागणार आहे.

कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद

भ्रष्टाचाराच्या विविध गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार, लोकसेवकाने पदीय कार्याच्या बाबतीत लाच घेणे (कलम ७), कुणीही लोकसेवकाला प्रभावित करण्यासाठी लाच घेणे (कलम ८) आणि लोकसेवकासोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाचा अवैध उपयोग करण्यासाठी लाच घेणे (कलम ९) या गुन्ह्यांसाठी आरोपीला ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, लोकसेवकाने कलम ८ व ९ मधील गुन्ह्यांना प्रोत्साहन देणे (कलम १०) व स्वत:कडील प्रकरणाशी संबंधित व्यक्तीकडून मौल्यवान वस्तू स्वीकारणे (कलम ११) याकरिता ६ महिने ते ५ वर्षे कारावास व दंड तर, फौजदारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्यास ४ ते १० वर्षे कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

पाच वर्षांत ४१८८ तक्रारी

राज्यभरामध्ये गेल्या पाच वर्षांत लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकूण ४ हजार १८८ तर, या वर्षी आतापर्यंत २९ तक्रारी करण्यात आल्या.

वर्षनिहाय तक्रारी पुढील प्रमाणे 

वर्ष - तक्रारी

२०१७ - ९२५

२०१८ - ९३६

२०१९ - ८९१

२०२० - ६६३

२०२१ - ७७३

येथे करा भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध तक्रार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक - १०६४ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० उपलब्ध आहे.

लाचेची मागणी सिद्ध करावी

भ्रष्ट लोकसेवकाला या कायद्यांतर्गत शिक्षा हाेण्यासाठी लाचेची मागणी सिद्ध करणे आवश्यक असते. त्यामुळे पीडित नागरिकांनी याविषयी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. लोकसेवक अधिकृत कामे करण्यासाठी लाच मागत असल्यास त्याचे रेकॉर्डिंग करावे. त्याचा न्यायालयात उपयोग होऊ शकतो.

- ॲड. प्रकाश नायडू, प्रसिद्ध फौजदारी अधिवक्ता, नागपूर.

Web Title: An average of 838 complaints are lodged against corrupt public servants every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.