नागपुरात दर महिन्याला सरासरी ८४४ गंभीर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:28 PM2024-05-03T17:28:01+5:302024-05-03T17:29:01+5:30
२०२४ मध्येही गुन्ह्यांची सरासरी कायम : हत्या, विनयभंग, अत्याचारांची आकडेवारी चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत नवीन वर्षात गुन्ह्यांचा दर कमी होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात २०२३ च्या तुलनेत या वर्षी गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ८३३ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा हा आकडा सरासरी ८४४ वर गेला आहे. २०२१ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर हा सर्वाधिक आकडा आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे शहरातील गंभीर गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. २०२१ पासून ते मार्च २०२४ या कालावधीत नागपुरात किती गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले, हत्या अत्याचार-विनयभंग-फसवणूक यांचे प्रमाण किती होते याबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपुरात जानेवारी ते मार्च या कालावधीत २ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. याची सरासरी महिन्याला ८३३ इतकी होत आहे. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ९ हजार ९९९ गुन्हे नोंदविल्या गेले होते. तर, २०२१ मध्ये ८ हजार २३२ व २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
मागील काही काळापासून नागपुरात हत्यांच्या प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत नागपुरात २० हत्यांची नोंद झाली. २०२३ मध्ये पूर्ण वर्षभरात ७९ हत्या झाल्या होत्या.
*अशी आहे गुन्ह्यांची आकडेवारी
गुन्हा २०२१ २०२२ २०२३ २०२४ मार्चपर्यंत
हत्या ९५ ६५ ७९ २०
चोरी २५९० २५०३ ३५०५ ७६८
फसवणूक ४८८ ४९२ ६६० १७९
दंगे १५२ ७६ ११५ ४०
अत्याचार २३४ २५० २६३ ७२
विनयभंग ३५६ ३४० ५०६ ११४
महिला अत्याचारावर नियंत्रण कसे येणार ?
महिला अत्याचारांचा मुद्दा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. २०२३ मध्ये नागपुरात वर्षभरात महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती व दर महिन्याची सरासरी २२ गुन्हे इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ७२ गुन्हे नोंदविले गेले असून, प्रतिमहिना सरासरी २४ इतकी आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांतवरदेखील फारसे नियंत्रण आलेले नाही. २०२३ मध्ये विनयभंगाचे ५०६ गुन्हे नोंदविल्या गेले होते व दर महिन्याची सरासरी ४२ इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ११४ गुन्ह्यांची नोंद झाली असून दर महिन्याला विनयभंगाचे सरासरी ३८ गुन्हे दाखल झाले आहेत
निवडणुकांच्या वर्षात दंगे वाढीस
२०२४ हे निवडणुकीचे वर्ष असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, पोलिसांच्या आकडेवारीनुसार तीन महिन्यांत दंग्यांच्या घटना वाढीस लागल्या. २०२३ मध्ये दंगलीच्या कलमांतर्गत ११५ (प्रति महिना १०) गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी हा आकडा ४० (प्रति महिना १३) इतका आहे.