अनियंत्रिक कारच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 14:49 IST2022-09-03T14:43:50+5:302022-09-03T14:49:47+5:30
वर्धा मार्गावर घटना

अनियंत्रिक कारच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी
नागपूर : वर्धा मार्गावर अनियंत्रित कार रस्ता दुभाजक आणि विजेच्या खांबाला धडकल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचे चार मित्र जखमी झाले. एअरफोर्स ऑफिसर मेसजवळ शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. गौरव राघोर्ते असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. या अपघातात देवेश निघोट, वेदांत उदापुरे, तन्मय मेटांगले आणि अमन यादव हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचे पाचही मित्र सकाळी शुल्क भरायला महाविद्यालयात गेले होते. त्यानंतर ते त्यांच्या मित्राच्या फ्लॅटवर गेले. तेथून दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते महाविद्यालयातून नागपूरच्या दिशेने निघाले. एमएच ४९-एएस ३६०३ या क्रमांकाच्या कारने ते येत होते. एअर फोर्स ऑफिसर्स मेससमोर कार अचानक अनियंत्रित झाली व गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढली. यानंतर दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाला धडकून कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली. कारचा वेग जास्त असल्याने आतील सर्व विद्यार्थी जखमी झाले. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. बेलतरोडी पोलीस तत्काळ तेथे पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना एम्समध्ये नेले. उपचारादरम्यान गौरव राघोर्ते याचा मृत्यू झाला, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. कारचा अपघात कसा झाला याचा बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गौरव हा कामठीचा रहिवासी होता व दररोज तेथून महाविद्यालयात यायचा. अतिशय हुशार असलेल्या गौरवने जेईईमध्ये चांगले गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने अपघात ?
घटनास्थळावर जाऊन कारची पाहणी केली असता, कारचा चेंदामेंदा झाला होता. शिवाय कारचे समोरचे चाक पंक्चर होते. चाक पंक्चर झाल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले व त्यातून अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी सांगितला.