हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला भरधाव रेल्वेने चिरडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 07:28 PM2023-01-18T19:28:36+5:302023-01-18T19:30:46+5:30
Nagpur News मोबाइलला हेडफोन लावून बोलत बोलत रूळ ओलांडणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला भरधाव रेल्वेने चिरडले. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली.
नागपूर : मोबाइलला हेडफोन लावून बोलत बोलत रूळ ओलांडणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला भरधाव रेल्वेने चिरडले. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव (१९) रा.सातोना, जि.भंडारा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे वास्तव्याला होती.
आरती डोंगरगाव नजीकच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी.ई. प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. ती बुधवारी सकाळी टाकळघाट येथून एसटीने गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ आली. यानंतर ती पायी रेल्वे स्थानकाकडे रेल्वे फटकाजवळील रुळावरून निघाली. यावेळी आरती मोबाइलवर हेडफोन लावून कुणाशीतरी बोलत जात होती.
रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रूळ क्रॉस करताना हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही. तेवढ्यात येणारी रेल्वे इतरांना दिसली. त्यांनी आरडाओरड केली. मात्र हेडफोन लावून असल्याने तिला कुणाचाही आवाज ऐकू आला नाही. भरधाव आलेली पुणे-नागपूर रेल्वे गाडी क्र.२१२९ च्या खाली कटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला रेल्वे गाडीने ५० फूटपर्यंत फरपटत नेले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास ठाणेदार विशाल काळे करीत आहेत.