‘लिव्हर’ मिळवून देण्याच्या नावाखाली साडेचार लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: October 17, 2024 02:59 PM2024-10-17T14:59:39+5:302024-10-17T15:01:54+5:30
Nagpur : माणुसकीला काळीमा फासणारी घटना
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यकृत मिळवून देण्याच्या नावाखाली एका परिचित व्यक्तीनेच रुग्णाच्या मोठ्या बहिणीला साडेचार लाखांचा गंडा घातला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
श्वेता सुरेश दुबे (३९, मेहंदीबाग) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांच्या लहान भावाला यकृताचा आजार असल्याने त्यांना यकृत दात्याचा शोध होता. त्यांचा परिचित संदीप शिवदास कोचे (४२, इंदोरा) याने श्वेता यांच्याशी संपर्क साधला. मी तुम्हाला आवश्यक असलेले यकृत मिळवून देतो असे म्हणून त्याने श्वेता यांच्याकडून एप्रिल २०२३ मध्ये साडेचार लाख रुपये घेतले. मात्र त्याने कुठलेही यकृत मिळवून दिले नाही. दरवेळी तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. श्वेता यांनी त्याला पैसे परत मागितले असता त्याने शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच श्वेता यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी कोचेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.