आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया
By गणेश हुड | Published: June 1, 2023 03:27 PM2023-06-01T15:27:38+5:302023-06-01T15:28:25+5:30
फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली
नागपूर : तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्च शिक्षीत असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली आहे. यातून ते आज वर्षाला १० लाख रुपयाचे उत्पन्न घेत आहेत.
लांजे यांच्याकडे १७ एकर शेती आहे. त्यातील पाच एकरमध्ये ते लंगडा व दशेरी या जातीचे आंबे पिकवितात. याशिवाय त्यांच्या शेतामध्ये चवसा, केशर, फजली, तोतापली, अशी वेगवेगवेगळ्या जातीची जवळपास २२५ आंब्याची झाडे लावली आहेत. कृषी विभागाच्यावतीने आंबा महोत्सवाचे आयोजन जुने प्रशासकीय भवन येथे करण्यात आले. “ विदर्भाचा राजा चांदपूरचा लंगडा” आंबा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा अतिशय वाजवी दरामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. १५ जूनपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
उपन्न वाढविण्यासाठी पारंपारिक शेती पद्ध्तीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. अशा पध्दतीने शेतकऱ्यांनी फळबाग शेती करून उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत मजबूत करणे शक्य असल्याचे लांजे म्हणाले.
नैसर्गिक पध्दतीने पिकविलेले आंबे त्यांच्या शेतामध्ये आहे. आंब्याला डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोहोर येतो. आंब्याला दोन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परंतु योग्य पध्दतीने त्यांचे व्यवस्थापन व नियोजन केले तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे लांजे यांनी सांगितले, यामध्ये प्रामुख्याने तुडतुडा (मॅगो हापर) आणि फळमाशी (फुट फ्ल्याय) या किडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी किटकनाशकांचा वापर करून त्यांचा नायनाट करण्यात येतो.