शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांविरोधात अदखलपात्र गुन्हा
By योगेश पांडे | Published: May 10, 2024 11:53 PM2024-05-10T23:53:38+5:302024-05-10T23:59:34+5:30
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात ...
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलेलेच असताना पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. भाजपतर्फे पोलीस ठाणे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
भाजपच्या विधि सेलचे महानगर अध्यक्ष ॲड. परीक्षित गजानन मोहिते यांनी मागील आठवड्यात तक्रार केली. तक्रारीनुसार वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भाजप व भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य तथ्यहीन असून, न्यायालयाचादेखील अवमान करणारे आहे अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली होती. भाजपकडून निवडणूक आयोगातदेखील तक्रार दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी वडेड्डीवार यांच्या विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी वडेट्टीवार यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.