नागपूर कारागृहात फाशीच्या कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 03:12 PM2022-07-21T15:12:30+5:302022-07-22T10:23:59+5:30
अलीकडेच एका कैद्याच्या मृत्यूवरून नातेवाइकांनी तुरुंग प्रशासनावर अत्याचाराचा आरोप केला होता. कारागृहात ज्या पद्धतीने गंभीर घटना सातत्याने घडत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या एका बंदीवानाकडून दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात संबंधित कैदी जखमी झाला असून हल्लेखोर कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर कैद्यांनी वेळेत धाव घेतली नसती, तर दुसऱ्या कैद्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हल्लेखोर कैद्याला २००६ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी सुनावण्यात आली होती. या प्रकारामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.
नावेद हुसेन खान उर्फ रशीद हुसेन खान याला हत्येच्या गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. १० ऑक्टोबर २०१५ पासून तो नागपूर कारागृहात आहे. फाशीचा कैदी असल्याने त्याला सुरक्षा विभागात बंदिस्त ठेवण्यात आले आहे. कोठडी क्रमांक चारमध्ये मोक्काच्या आरोपाखाली कैदेत असलेल्या झुल्फीकार जब्बार गनी याच्याशी त्याचा वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्याची तो संधी शोधत होता. २० जुलै रोजी सात वाजता नावेद बंदीस्त असलेल्या कोठडी क्रमांक तीनमधून झुल्फीकारच्या कोठडी क्रमांक चारमध्ये गेला. टॉवेलमध्ये बारीक खडी व दगड बांधून त्याने झुल्फीकारच्या डोके व मानेवर प्रहार केले.
यात तो जखमी झाला. इतर कैदी व सुरक्षारक्षकांनी लगेच धाव घेत झुल्फीकारला वाचवले. पोलीस अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या सूचनेवरून धंतोली पोलीस ठाण्यात नावेदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला आहे.
अगोदरदेखील कारागृहात मारहाणीची प्रकरणे
दोन महिन्यांपूर्वी अंडा सेलमध्ये बंदिस्त असलेल्या गुन्हेगार शेखू खानजवळ मोबाइल सापडला होता. यापूर्वी गुन्हेगार रोशन शेख यानेही फाशीच्या आवारात गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका कैद्याच्या मृत्यूवरून नातेवाइकांनी तुरुंग प्रशासनावर अत्याचाराचा आरोप केला होता. कारागृहात ज्या पद्धतीने गंभीर घटना सातत्याने घडत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नावेदसह मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक दहशतवादी नागपूर कारागृहात बंद आहेत. त्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच अनेक नक्षलवादी आणि त्यांचे नेतेही येथे आहेत. ताज्या घटनेने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेनंतर नावेद आणि झुल्फिकार यांच्या बराकीत बदल करण्यात आला आहे. दोघांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे.