सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 04:48 PM2022-09-05T16:48:12+5:302022-09-05T16:48:31+5:30
अंबाडा येथील घटना
जलालखेडा (नागपूर) : सततचा मुसळधार पाऊस, तीनदा केलेली पेरणी, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे चिंतित असलेल्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:च्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.
विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी सततच्या मुसळधार व अतिरिक्त पावसामुळे त्यांना तीनदा पेरणी करावी लागली. एवढे करूनही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याने समाधानकारक उत्पादन हाेण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे पीककर्ज असून, कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना भेडसावत हाेती. शिवाय, सरकारने आर्थिक मदतीही दिली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
त्यांच्या पत्नीला शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाेपेतून जाग आली असता, त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच मुलगा कैलास व शेजाऱ्यांना जाग आली. माहिती मिळताच पाेलिसांनी मध्यरात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
नरखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र
नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वेगवेगळ्या मार्गाने स्वत:ला संपवत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.