जोडे बाहेर काढ म्हटल्याने वृद्धाला बेदम मारहाण
By योगेश पांडे | Published: June 7, 2023 05:17 PM2023-06-07T17:17:20+5:302023-06-07T17:20:03+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : एका संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात आलेल्याला जोडे बाहेर काढून ये असे म्हणणाऱ्या वृद्धाला तीन ते चार आरोपींनी बेदम मारहाण केली. वृद्धाला इतके मारण्यात आले की उपचारासाठी अतिदक्षता विभागातच दाखल करावे लागले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लक्ष्मण राजनारायण मिश्रा (६५,न्यू स्वराज नगर) हे वेकोलितून निवृत्त झाले असून ते एका जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी काम करतात. त्यांच्यासोबत प्रेमचंद्रसिंह श्यामानंदसिंह हेदेखील होते. सायंकाळच्या सुमारास संदीप भेंडे हा इसम कार्यालयात आला. त्यावेळी मिश्रा यांनी त्याला जोडे बाहेर काढून आत ये असे सांगितले. यावरून संदीप संतापला. तो बाहेर गेला व काही वेळाने तीन अनोळखी इसमांना घेऊन आला.
सर्वांनी मिश्रा यांना बेदम मारहाण केली. मिश्रा यात खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली. प्रेमचंद्रसिंह यांनी मध्यस्थी करत मिश्रा यांचा बचाव केला. त्यांना तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रेमचंद्रसिंह यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी संदीप भेंडेसह इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.