लॉन्ड्री चालवून उपजिविका भागवणाऱ्या वृद्धाला ट्रकने चिरडले, चालकास अटक 

By दयानंद पाईकराव | Published: May 19, 2024 05:50 PM2024-05-19T17:50:12+5:302024-05-19T17:50:17+5:30

वृद्ध पत्नी अन् नातु उघड्यावर, मुलाचाही झाला होता अपघाती मृत्यू

An old man who earned his livelihood by running a laundry was crushed by a truck, the driver was arrested | लॉन्ड्री चालवून उपजिविका भागवणाऱ्या वृद्धाला ट्रकने चिरडले, चालकास अटक 

लॉन्ड्री चालवून उपजिविका भागवणाऱ्या वृद्धाला ट्रकने चिरडले, चालकास अटक 

नागपूर: मुलाचा १० वर्षापूर्वी अपघातातमृत्यू झाल्यानंतर वृद्ध वडिलांनी आपली वृद्ध पत्नी आणि नातवासाठी लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरु केला. परंतु नियतिला ते सुद्धा मान्य नव्हते. शुक्रवारी भरधाव आयशर ट्रकने लॉन्ड्री बंद करून पायदळ घराकडे परत येत असलेल्या वृद्धाला धडक दिली अन् ते जागीच ठार झाले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

कृष्णराव व्यंकटराव दळवी (७८, रा. सारीपुत्रनगर, टेकडीवाडी) असे या अपघातातमृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर श्रवणकुमार शिवराम यादव (२३, रा. जगजीवनरामनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. कृष्णराव यांच्या मुलाचे १० वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. तेंव्हापासून ते आपली वृद्ध पत्नी आणि नातवासह राहत होते. कुटुंबाची जबाबदारी कृष्णराव यांच्यावर आल्यामुळे त्यांनी लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायावर ते आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवित होते. शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी आपले लॉन्ड्रीचे दुकान बंद केले. ते पायदळ घराकडे परत येत होते.

तेवढ्यात खडगावकडून वाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर शिवाजी चौकाच्या पुढे खडगाव रोडने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम. एच. ०४, ई. एल-९२९५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून कृष्णराव यांना जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सुजल सुनिल दळवी (२०, रा. सारीपुत्रनगर) याने दिलेल्या तक्रारीवरून वाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. कुटुंबाचा आधार असलेल्या वृद्ध कृष्णराव यांचा अपघातात जीव गेल्यामुळे वाडीच्या सारीपुत्रनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: An old man who earned his livelihood by running a laundry was crushed by a truck, the driver was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.