ऑन ड्युटी रेल्वे अभियंत्याला मालगाडीने चिरडले
By नरेश डोंगरे | Published: February 9, 2024 10:03 PM2024-02-09T22:03:46+5:302024-02-09T22:03:59+5:30
रेल्वे अधिकारी म्हणतात, माहितीसाठी कार्यालयात या
नागपूर: दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत तुमसर स्थानक ते मुंडीकोटा दरम्यान रेल्वे ट्रॅकचे मेंटेनन्स करण्यासाठी निघालेल्या वरिष्ठ अभियंता अजय कुमार रघुवंशी यांना मालगाडीने चिरडले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेबाबत दपूम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांकडे या संबंधाने विचारणा केली असता त्यांनी या संबंधाने माहिती पाहिजे असेल तर माझ्या कार्यालयात या, असे उत्तर दिले.
सुत्रांच्या माहितीनुसार, रघुवंशी हे बुधवारी आणि गुरुवारी रात्री २ वाजता पासून रेल्वेकडून ब्लॉक होण्याच्या प्रतिक्षेत होते. हावडा मुंबई लाईनवर उपरोक्त रेल्वे मार्गावर रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात पटरी बदलविण्यात येणार होती. डाऊन लाईनवर रेल्वे कर्मचारी आणि सुमारे ४० कामगारही होते. अपघाताच्या १० ते १५ मिनिटांपूर्वी रघुवंशी यांना ब्लॉकचा मेसेज मिळाला होता. त्यामुळे झोप न घेताच रघुवंशी कर्तव्यावर निघाले. कारण त्यांच्यावर दोन तासांत काम पूर्ण करण्याचे दडपण होते. त्यामुळे ते मेसेज मिळताच डाऊन ट्रॅककडे निघाले. त्यांनी जशी पटरी पार करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात वेगात आलेल्या मालगाडीने त्यांना चिरडले. या अपघातानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले.
या अपघातानंतर घटनास्थळी कोणते अधिकारी पोहचले, याबाबत माहिती घेण्यासाठी दपूम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्याकडे शुक्रवारी सायंकाळी संपर्क केला असता त्यांनी 'माझ्या कार्यालयात या, नंतर बोलू' असे उत्तर दिले. नमूद रेल्वे मार्गावर ब्लॉक संदर्भात विचारणा केली असता त्यांनी 'माहिती नाही', असे म्हटले.
अधिकाऱ्यांची तटस्थता
उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याच्या मनगटात फ्रॅक्चर आल्याने रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी वरिष्ठांची तटस्थता बघता रेल्वे कर्मचाऱ्यांनी जोरदार हंगामा केला होता. या घटनेनंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे दोन शिर्षस्थ अधिकाऱ्यांची येथून बदली झाली. आता मुंडीकोटा प्रकरणात काय होते, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.