आयुष्याची परीक्षा अनन्या हरली ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:08 AM2018-06-09T00:08:20+5:302018-06-09T00:08:54+5:30
दहावीचा निकाल लागला आणि तिलाही आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. घरी अठराविश्वे दारिद्र्य सहन करताना जेमतेम टक्क्याने उत्तीर्ण झालेल्या तिच्यासाठी हे यशही मोठे होते. शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन तिने पेढे घेतले आणि वस्तीत आनंदाने वाटलेही. पण तिचा हा आनंद नियतीला फार काळ मान्य नव्हता. सायंकाळ होता होता काळाने डाव साधला. घर झाडताना अचानक टेबल फॅन अंगावर पडला आणि विजेचा जोरदार धक्का लागून यातच तिचा अंत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीचा निकाल लागला आणि तिलाही आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. घरी अठराविश्वे दारिद्र्य सहन करताना जेमतेम टक्क्याने उत्तीर्ण झालेल्या तिच्यासाठी हे यशही मोठे होते. शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन तिने पेढे घेतले आणि वस्तीत आनंदाने वाटलेही. पण तिचा हा आनंद नियतीला फार काळ मान्य नव्हता. सायंकाळ होता होता काळाने डाव साधला. घर झाडताना अचानक टेबल फॅन अंगावर पडला आणि विजेचा जोरदार धक्का लागून यातच तिचा अंत झाला.
हृदय हेलावणारी ही घटना शुक्रवारी सायंकाळी रामबाग परिसरात घडली. त्या दुर्दैवी मुलीचे नाव अनन्या राजेश मसराम असे आहे. अनन्याचे वडील राजेश हे कॅटरिंगचे काम करतात तर आई बैद्यनाथ चौकाजवळ हातठेल्यावर चहा विकून कुटुंबाला आधार देते. उंटखाना येथील मिलिंद हायस्कूलमध्ये शिकणारी अनन्या यावर्षी दहावीला होती. शुक्रवारी निकाल लागला आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. घरातील सर्व काम करताना शक्य तसा अभ्यास करून तिने ४७ टक्के गुण पदरात पाडले. हे गुण अनन्यासाठी मोठेच होते. हा आनंद इतरांशी वाटायचा होता, मात्र पेढे आणण्यासाठी घरी पैसे नव्हते. तिने शेजाºयांकडून पैसे उधार घेतले आणि पेढे आणून आसपासच्या घरी वाटले.
आज ती अतिशय आनंदात होती. आई येईपर्यंत तिने घरचे एकेक काम संपविणे सुरू केले. सार्वजनिक नळावरून पाणी भरले आणि घर झाडण्यास सुरुवात केली. छोटेसे घर झाडताना टेबल फॅनच्या ताराला ती अडकली व फॅन तिच्या अंगावर पडला. फॅनच्या जिवंत तारांचा जोरदार धक्का तिला लागला. यावेळी तिची आजी घरी होती. नातीला वाचविण्यासाठी ती धावली, मात्र तिलाही जोराचा करंट लागून ती फेकल्या गेली. जोरात किंचाळल्याने शेजाºयांनी धाव घेतली व फॅनचा प्लग काढला. मेडिकलला नेताना गेटजवळच अनन्याने प्राण सोडला. या अपघातात तिची आजी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. आईवडील घरी येण्यापूर्वीच अनन्याचा दहावी पास होण्याचा आनंद संपला होता. तिच्या अशा अकस्मात मृत्यूने परिसरात अतिशय हळहळ व्यक्त केली जात आहे.