देशात अराजकता, संघर्ष अटळ
By admin | Published: April 14, 2017 03:03 AM2017-04-14T03:03:03+5:302017-04-14T03:03:03+5:30
देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे.
कन्हैयाकुमार : ‘बिहार से तिहार’ मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे. परंतु या विचारसरणीला लढा देण्यासाठी वैचारिक संघर्ष यापुढे सातत्याने होणार आहे. देशातील अराजकतेविरुद्ध संघर्ष अटळ असल्याचा इशारा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी नागपुरात दिला.
अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह आणि आयटकतर्फे आयोजित कन्हैयाकुमारने लिहिलेल्या ‘बिहार से तिहार’ पुस्तकाचे सुधाकर शेंडगे यांनी मराठीत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन गुरुवारी कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत धनवटे कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार, आयटकचे श्याम काळे, संगीता महाजन उपस्थित होते.
यावेळी कन्हैयाकुमार पुस्तकासंदर्भात बोलले की, मी लेखक नाही आणि यापुढे पुस्तकही लिहिणार नाही. माझी ही आत्मकथाही नाही. मात्र माझा जो संघर्ष आहे त्याचे संक्षिप्त विवरण या पुस्तकात आहे. अनेकांना कन्हैयाकुमार माहिती नाही, त्यांना कन्हैयाकुमार कळावे, त्यामुळे माझा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. या समाजात जे समता, लोकतंत्र व न्यायासाठी संघर्ष करीत आहे, त्यांना माझे पुस्तक समर्पित आहे. पुस्तकातून क्रांती होईल, ही माझी अपेक्षा नाही, परंतु बरेच काही होईल, हा विश्वास आहे. माझ्याबद्दल समाजात जे भ्रम पसरविले आहे, या पुस्तकातून ते दूर होणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, परिवर्तनवादी देशात समाजाचे विघटन झाले आहे. समाज वेगवेगळ्या फळ्यांमध्ये विभागला आहे. हुकूमशाहीचे आगमन होत आहे.
देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण होत आहे. या गोष्टी अशक्य करायच्या असतील तर एक पावनखिंड लढवावी लागले. त्यासाठी गटातटाच्या लोकांना एकत्र यावे लागेल. या पुस्तकातून कन्हैयाकुमारसारख्या तरुण लेखकाने व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला आहे. परिवर्तन आणायचे असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणा, पुनर्रचना करा आणि क्रांतीशी हातमिळवणी करा, असे पुस्तकातून कन्हैयाकुमार सांगतो आहे. याप्रसंगी प्रा. हरिभाऊ केदार म्हणाले की, कन्हैयाकुमार यांनी या पुस्तकातून देशाला परिवर्तनाची दिशा दिली आहे. (प्रतिनिधी)