मोतिबाग परिसरातील पुरातन विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:56+5:302021-05-17T04:07:56+5:30
नागपूर : मोतिबाग परिसरात पाच पुरातन विहिरी आहेत. परंतु या पैकी तीन विहिरीत कचरा साचला असून या विहिरी नामशेष ...
नागपूर : मोतिबाग परिसरात पाच पुरातन विहिरी आहेत. परंतु या पैकी तीन विहिरीत कचरा साचला असून या विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दोन विहिरींमध्ये पाणी आहे. परंतु यातील एका विहिरीची सफाई केल्यास त्या विहिरीतील पाणी वापरण्या योग्य होऊ शकते. त्यामुळे या विहिरींची योग्य देखभाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोतिबाग रेल्वे परिसरातील या विहिरीतील पाण्याचा वापर पूर्वी वाफेच्या इंजिनसाठी करण्यात येत होता. रेल्वे क्वार्टरमध्येही याच विहिरीतील पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. परिसरातील नागरिकही या विहिरीतील पाण्याचा वापर करीत होते. आज मोतिबाग परिसरातील पाचपैकी तीन विहिरीत कचरा साचला आहे. दोन विहिरीत पाणी आहे. परंतु एकाच विहिरीतील पाणी वापरण्यायोग्य आहे. दुसरी विहिरी स्वच्छ केल्यास त्यातील पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. कचरा साचलेल्या तीन विहिरींची सफाई केल्यास त्यातील पाणीही वापरात आणणे शक्य होणार आहे. मोतिबाग रेल्वे परिसरात पाण्याचे प्रचंड स्त्रोत आहेत. या परिसरातील पाचही विहिरी आपल्या भव्यतेमुळे प्रसिद्ध होत्या. परंतु काळाच्या ओघात त्या नागपूरकरांच्या स्मरणातही राहिल्या नाहीत. यातील तीन विहिरी भोसलेकालीन आहेत. सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे महापालिकेकडून दररोज ६५ लाख लीटर पाणी खरेदी करते. रेल्वे क्वार्टर, रेल्वे कारखाना, डिझेल शेडसह सर्व ठिकाणी महापालिकेच्या पाण्याचा वापर होतो. परंतु रेल्वेने आपल्या विहिरींची देखभाल केल्यास रेल्वेला महापालिकेकडून पाणी घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मोतिबाग रेल्वे परिसरातील पाचही विहिरींची देखभाल करण्याची मागणी होत आहे.
............
पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करावे
‘महापालिका पाण्याची गरज भागवित असल्यामुळे मोतिबाग रेल्वे परिसरातील पुरातन विहिरींकडे दुर्लक्ष होत आहे. पुरातन विहिरींचा वारसा जपण्याची गरज असून या विहिरींचे पुनरुज्जीवन करून या भागाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करावे.’
-प्रवीण डबली, माजी सदस्य झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती
.......