अन् दुर्घटना टळली
By admin | Published: June 19, 2017 02:23 AM2017-06-19T02:23:04+5:302017-06-19T02:23:04+5:30
अजनी लोकोशेडमध्ये कार्य निरीक्षकामुळे तरुण कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेपासून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही.
रेल्वे रुळाजवळील क्रेनचा खांब झाला तिरपा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी लोकोशेडमध्ये कार्य निरीक्षकामुळे तरुण कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेपासून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. नागपूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारील क्रेनचा बूम तिरपा झाला. जर हा बूम रेल्वे रुळाच्या दिशेने असता आणि तेथून रेल्वेगाडी जात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कंत्राटदाराला दिलेले काम शुक्रवारीच पूर्ण झाल्यामुळे आमचा या घटनेशी काहीच संबंध नसल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत हात वर केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर डायमंड क्रॉसिंगच्या जवळून जाणारी नॅरोगेज लाईन बंद करण्यात आली आहे. या लाईनवर ब्रॉडगेज लाईन जाते. ही लाईन लोखंडी पुलाच्या स्ट्रक्चरवर टाकण्यात आली आहे. नॅरोगेज लाईन बंद झाल्यामुळे लोखंडी पुलाच्या ठिकाणी पक्का पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लोखंडाचा पूल हटविण्याचे काम मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन दिवसात पूर्ण केले. हे काम पाहणाऱ्या कंत्राटदार कंपनी व्ही. एस. क्रेन्स अॅन्ड मुव्हर्सच्या दोन क्रेन कामाला लावण्यात आल्या होत्या. त्यांनी हे काम शुक्रवारी रात्री पूर्ण केले. लोखंडाच्या पुलाचे निघालेले लोखंड रेल्वे रुळाच्या जवळच ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आज या स्ट्रक्चरला हटविताना एका क्रेनचा बूम तिरपा झाला. यावेळी ही क्रेन रेल्वे रुळाच्या अतिशय जवळ होती. जर क्रेनच्या बूमची दिशा रेल्वे रुळाकडे असती आणि तेथून रेल्वेगाडी जात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मते, लोखंडाच्या पुलाचे लोखंड काढण्याचे काम ब्लॉक घेऊन कालच पूर्ण करण्यात आले. अशात जर कंत्राटदाराच्या क्रेनसोबत काही घटना घडली असेल तर त्याचा रेल्वे प्रशासनाशी काही संबंध नाही. त्यांनी लोकमतच्या छायाचित्रकारासोबत कंत्राटदार विक्रम सोखी यांनी केलेल्या उद्धटपणाच्या वागणुकीबद्दल मौन पाळले.
छायाचित्रकाराची कॉलर पकडून हिसकावला कॅमेरा
नागपूर रेल्वेस्थानकाजवळ कंत्राटदार व्ही. एस. क्रेन्स अॅन्ड मुव्हर्सच्या क्रेनचा बूम तिरपा झाल्याची घटना माहीत होताच या घटनेचा फोटो घेण्यासाठी लोकमतचे छायाचित्रकार संजय लचुरिया घटनास्थळी पोहोचले. ते क्रेनचा फोटो घेत असताना कंत्राटदार विक्रम सोखी याने त्यांची कॉलर पकडून कॅमेरा हिसकावला. येथून निघून जा अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या कंत्राटदाराने संबंधित छायाचित्रकाराला दिली.