.. आणि झाले 'अमृतांजन पूल' असे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 07:47 PM2020-04-21T19:47:52+5:302020-04-21T19:53:46+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे.
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणूस वर्तमानात जगत असला तरी तो अनेक प्राचिन, ऐतिहासिक वस्तू, गोष्टी सोबत घेऊन चालतो. प्राचिन आणि ऐतिहासिक काळातील अनेक बांधकामे आजही टिकून आहेत. त्यातील काही बांधकामे जिर्ण झाल्याने ती स्वत:च पडतात किंवा काहींना पाडून त्या जागी नवे निर्माण करावे लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे.
ज्या व्यक्तीमुळे या पुलाचे नामकरण अमृतांजन पुल असे झाले ते पेन्टर एम.एच. तिवारी यांचे पुत्र भागवत तिवारी नागपुरात राहतात. एम.एच. तिवारी यांचे निधन १६ नोव्हेंबर १९९९ रोजी नागपुरातच झाला. २२ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आणि आज जर ते असते तर २२ एप्रिल २०२० रोजी ते ९८ वषार्चे असते. एम.एच. तिवारी भुसावळ येथील बी.के. नाईक एण्ड सन्स होर्डिंग अडव्हर्टायझर्स येथे नोकरीला होते. त्यावर तिवारी वर्धा येथे वास्तव्याला असत. १९३६-३७ मध्ये नाईक यांनी तिवारी यांना भुसावळला नेते. त्यानंतर कंपनीचा विस्तार झाला आणि नाईक पुणे येथे वास्तव्याला गेले आणि कंपनीचे मुख्य कार्यालयही पुणे येथेच हलविले गेले. त्या काळात ही कंपनी जाहीरात क्षेत्रात अग्रगण्य होती. दरम्यान मुंबईचे एम.डी. पिटीट नावाच्या पारसी इसमाने आपली पुणे-मुंबई येथील जागा विकण्याचे निश्चित केले होते. ही जागा ज्या ठिकाणी होती तेथे ग्रेट इंडियन पेनिनसुला (जीआयपी) रेल्वेचे रिव्हर्सिंग स्टेशन होते. हे स्टेशन म्हणजे आता ज्या ठिकाणी पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील सह्याद्रीचा विशाल डोंगर आडवा येतो, ते स्थान. पुढे हे स्टेशन बंद पाडून इंग्रजांनी तेथे रस्ता वाहतूकींसाठी बोगदा खणला. त्याच बोगद्यावरून आताचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जातो आणि तो पूल आहे. पुल क्रॉस केल्यानंतर येणाऱ्या वळणावर नाईक यांनी पिटीट यांच्याकडून जागा विकत घेतली होती. तेथे नाईक आणि तिवारी यांनी विभिन्न कंपन्यांच्या जाहिरातींचे होर्डिंग्ज लावण्याचे निश्चित केले. पहिलीच ऑर्डर अमृतांजन बामकडून प्राप्त झाली. तेव्हा तिवारी यांनी अमृतांजन बामचे भव्य असे कटआऊट तेथे लावले. हे भारतातील पहिले शंभर बाय २० फुटाचे होर्डिंग होते. त्या पुलाजवळ अमृतांजनचे पहिले कटआऊट लागल्याने आणि बराच काळ ते होर्डिंग तेथे असल्याने जवळच असलेल्या पुलाचे नामकरण जनसामान्यांनी 'अमृतांजन पूल' असे करून टाकले आणि वषोर्नुवर्षे हा पूल संबंध देशभरात अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. आता हा पूल नष्ट करण्यात आला असला तरी त्या पुलाच्या आठवणी वडिलांच्या आठवणींसह स्मरणात असल्याचे भागवत तिवारी यांनी सांगितले.
भागवत तिवारी यांनी शेअर केल्या आठवणी
एम.एच. तिवारी यांचे पुत्र भागवत तिवारी यांनी लोकमतकडे वडिल आणि अमृतांजन पुलासंदर्भात आठवणींना उजाळा दिला. ५ एप्रिल २०२० रोजी हा पुल पाडण्यात आला आणि २२ एप्रिल रोजी वडीलांची जयंती असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या पुलाचे जुने फोटो, तेव्हा लावण्यात आलेले कटआऊट होर्डिंग शेअर केले. त्या पुलाच्या नामकरणात बाबांचा हातभार असल्याने त्याबद्दल आम्हा कुटूंबीयांना अभिमान वाटत असल्याचे भागवत तिवारी म्हणाले.