.. आणि तयार झाले जबाबदारीचे ‘सोशल कनेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:28 AM2020-04-08T11:28:40+5:302020-04-08T11:30:07+5:30
नागपूरच्या काही तरुणांनी देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या महामारीने भल्याभल्या देशांना विळख्यात घेतले, तसे ते संकट भारतावरही ओढवले आहे. या कठीण प्रसंगी संकटाची प्रत्यक्ष झळ पोहचलेल्यांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर एकीकडे अफवांचे पेव फुटले असताना याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींनी मदतीचा सेतू उभा केला आहे. नागपूरच्या काही तरुणांनी असा देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. जगात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला तसा समाजमाध्यमांवर अफवांचा बाजार सुरू झाला होता. यावरील संदेशांनी लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. कोरोनाबाबत पसरविण्यात येणारे यातील बहुतेक संदेश खोटे (फेक) असूनही सामान्य नागरिकांना याची जाणीव नसल्याने अधिक नुकसानकारक होते. अशी खोटी माहिती पसरविणाऱ्या संदेशांची पोलखोल करण्यासाठी खरेतर या ग्रुपची निर्मिती झाल्याचे डॉ. अभिक घोष यांनी सांगितले. आलेल्या संदेशाला इंटरप्रीट करून त्यातील खरेपणा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी माध्यम तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला. पुढे मात्र या कामाची व्याप्ती वाढत गेली. लॉकडाऊनमुळे समाजातील वेगवेगळ्या वर्गातील लोक अडचणीत आले. ही अडचण लक्षात घेऊन तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्वात महत्त्वाची होती वैद्यकीय मदत. आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी शहरातील बहुतेक डॉक्टरांचे क्लिनिक, नर्सिंग होम, रुग्णालये बंद झाली आहेत. अशावेळी साधा ताप, खोकला जरी असला तरी लोकांमध्ये भीती निर्माण होते. अशांसाठी ‘डॉक्टर्स आॅन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली. कोणत्याही आजारामध्ये प्राथमिक उपचार मिळेल, यासाठी ग्रुपमध्ये असलेले तरुण डॉक्टर्स मदतीसाठी पोहचू लागले. लोकांची भीती दूर करण्यासाठी ग्रुपमधल्या ५ मानसोपचारतज्ज्ञ आणि २५ कौन्सिलर्सची मदत घेतली जात आहे. या काळात कुणी मदतीसाठी नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व आजारी रुग्णांना मोठी समस्या सहन करावी लागत असल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी औषधोपचार आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याची सेवाही राबविली आहे. यातूनच पुढे अन्न पुरवठ्याचीही संकल्पना आली आणि भुकेल्या गरजूंपर्यंत दररोज २०० पॅकेट्स शिजलेले अन्न पोहचविण्याची सेवाही सुरू झाली. ग्रुपमधील जवळपास १८० सदस्यांच्या संपर्कातूनच हे सर्व सेवाकार्य चालले आहे. विशेष म्हणजे यातील काही आर्थिक संपन्न व्यक्तींनी या प्रत्येक कामासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या ग्रुपमधील जाणकारांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. अडचणीत फसलेल्या इतर शहरांतील लोकांना त्या त्या शहरातील सदस्यांद्वारे तातडीची मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही डॉ. घोष यांनी य्पष्ट केले. अशाप्रकारे सोशल मीडियातून सामाजिक जाणिवेचा सेतू उभा राहिला आहे.