..अन् नर्तिकेच्या भुताचा झाला मुंगूस
By admin | Published: November 17, 2014 12:55 AM2014-11-17T00:55:45+5:302014-11-17T00:55:45+5:30
मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील
अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत : ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शन व परिसंवाद
नागपूर : मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील नृत्यांगनेचे भूत येथे नृत्य करते त्यामुळे तेथे न राहणेच योग्य, असे त्यांनी सांगितले. त्या नर्तिकेच्या भीतीने येथे कुणीच येत नाही, असेही सांगण्यात आले. मला कुतूहल वाटले म्हणून मी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. काय भानगड आहे, ती पहावी म्हणून मी थांबलो. रात्री खरेच घुंगरांचा आवाज आला. टार्च लावून ती नृत्यांगना शोधायला मी बाहेर पडलो तर गळ्यात घुंगरू बांधलेला मुंगूस उंदरांच्या मागे धावताना दिसला, अशी जंगलातील गंमत सांगत ज्येष्ठ अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन आज अरण्यप्रेमींचे समाधान केले.
स्वरसाधना आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शनात त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
पूर्णचंद्रराव बुटी सभागृहात त्यांची मुलाखत डॉ. सुहास पुजारी आणि विवेक देशपांडे यांनी घेतली. याप्रसंगी चितमपल्ली यांनी त्यांच्या अनुभवांची शिदोरी उपस्थितांसमोर रिती करून जंगल वाचविण्याचे आवाहन केले. सातारा, सांगली परिसरात एक वनाधिकारी होते. त्यांनी त्या भागात सागवानाचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हत्तींचा कळप येऊन सागाच्या झाडांची नासधूस करायचा.
आदिवासी मुलीकडून त्यांना एक सूचना मिळाली. उंटावर बसून जंगलाचे रात्री रक्षण करायचे. त्यांनी तसेच केले. हत्तींनी उंट कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे उंटाला पाहिल्यावर हत्तींचा कळप पळून जायचा, अशी आठवण त्यांनी सांगितली. मराठीत समुद्राच्या सृष्टीबाबत लेखनच झाले नाही. पण समुद्रात विविध प्रकारचे प्राणी आहे. खेकडे, शार्क, डॉल्फीन यांचेही वेगवेगळे प्रकार आहे. ते अभ्यासण्यासाठी मी कोकणात राहिलो. त्यावर सध्या लेखन सुरू आहे. विद्यार्थीदशेत एक शिक्षक वृक्षांची माहिती समरसून द्यायचे. खडकाळ जागेतल्या चंदनाच्या झाडाला सुगंध असतो तर सुपीक जागेतल्या चंदनाच्या झाडाला मात्र सुगंध नसतो. माणसाचेही तसेच आहे. यातना सहन केलेला माणूसच काहीतरी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आदर्शावरच मी जीवन जगलो, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)