अन् नागपूर कारागृहाच्या भेसूर भिंती हसल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:08 PM2019-11-15T12:08:44+5:302019-11-15T12:10:26+5:30

उंच, उंच भक्कम दगडी भिंती आणि आतबाहेरचे रुक्ष वातावरण बघून कारागृहच काय, कारागृहाच्या आजूबाजूलाही भटकण्याची कुणाची इच्छा होत नाही. गुरुवारी मात्र भल्या सकाळपासूनच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनाहूत पाहुण्यांनी गर्दी केली होती.

And the fragile walls of the Nagpur jail were smiled! | अन् नागपूर कारागृहाच्या भेसूर भिंती हसल्या!

अन् नागपूर कारागृहाच्या भेसूर भिंती हसल्या!

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्यांचा चिवचिवाटगळाभेट कार्यक्रमअन् लगबग, रुक्ष वातावरणात पेरली गेली हिरवळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उंच, उंच भक्कम दगडी भिंती आणि आतबाहेरचे रुक्ष वातावरण बघून कारागृहच काय, कारागृहाच्या आजूबाजूलाही भटकण्याची कुणाची इच्छा होत नाही. गुरुवारी मात्र भल्या सकाळपासूनच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनाहूत पाहुण्यांनी गर्दी केली होती. सूर्य जसजसा वर येत होता, तसतशी या पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. वर्दळच नव्हे तर आतबाहेर अस्वस्थताही ताणली जात होती. अखेर तो क्षण आला अन् पुढे कारागृहाच्या भेसूर भिंतीही हसू लागल्या. चिमुकल्यांचा चिवचिवाट अन् लगबग रुक्ष वातावरणात हिरवळ पेरणारी ठरली. निमित्त होते गळाभेट कार्यक्रमाचे.
कारागृह प्रशासनाकडून वर्षांतून दोनदा गळाभेट उपक्रम पार पाडला जातो. त्यासाठी कैद्यांच्या नातेवाईकांना दोन आठवड्यांपूर्वीच सूचना दिली जाते. त्यांच्याकडून नावे मागवून घेतल्यानंतर गळाभेटीचा कार्यक्रम पार पडतो. आज गुरुवारी बालक दिनाचे औचित्य साधून कारागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना त्यांच्या चिमुकल्यांना भेटता येणार होते तर, कित्येक दिवसांपासून ज्याला बघितलेही नाही, तो आपला जन्मदाता, जन्मदात्री हिची आज प्रत्यक्ष भेट घेता येणार होती. त्याच्यासोबत गुजगोष्टी करता येणार होत्या म्हणून सकाळी ७ वाजल्यापासूनच कारागृहाच्या आत आणि बाहेरची अस्वस्थता क्षणोक्षणी तीव्र होत होती. अखेर तो क्षण आला. सकाळी ९ वाजता कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार उघडले गेले अन् बाहेर असलेल्या चिमुकल्यांना आतमध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारागृहाच्या आत गळाभेट सुरू झाली. ज्या कैद्यांची मुले एकदमच छोटी असेल तर त्याच्या पत्नी किंवा अन्य नातेवाईकांना या चिमुकल्यांना कारागृहात आणण्याची मुभा दिली जाते. त्यानुसार, दोन महिला आणि ६० पुरूष अशा एकूण ६२ कैद्यांची १११ मुले आणि नातेवाईकांसह १३१ जणांना टप्प्याटप्प्याने कारागृहात प्रवेश देण्यात आला.
आपल्या काळजाच्या तुकड्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी आतूर असलेल्या कैद्यांना मुलगा, मुलगी समोर आल्याचे पाहून प्रारंभीचे काही क्षण अत्यानंदामुळे काही सुचतच नव्हते. अनेकजण नसते त्यांना छाताशी कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. नंतर मात्र, त्यांना खाऊ देणे, त्यांच्याशी हितगूज साधण्यात, चिमुकल्याचा खोडकरपणा पहाण्यात ते दंग झाल्याचे चित्र होते. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कैदी आणि त्यांच्या मुलांसाठी शिरा, पुरी, भाजीची व्यवस्था केली होती. शिवाय चॉकलेट, वेफर्स, बिस्कीट चिवडा आदीही कारागृहातून उपलब्ध करून दिले होते.

कुणी बनले घोडा, कुणी बनले अ‍ॅक्टर
समजाच्या लेखी क्रूर ठरलेले हे कैदी आपल्या चिमुल्यांसाठी लहानगे झाले होते. कुणी आपल्या मुलांसाठी घोडा बनून त्यांना पाठीवर बसवून फिरत होते तर, कुणी प्राण्यापक्ष्याचे आवाज काढत मिमिक्री करताना दिसत होते तर कुणी आपल्या मुलांना अ‍ॅक्टिंग करून दाखवत होते. बापलेक अन् मायलेकांमधील हा सर्वोच्च आनंदाचा कार्यक्रम ३० मिनिटे चालत होता. नंतर, दुसºया कैद्यांना आणि त्यांच्या मुलांना बोलवून घेतले जात होते. या कार्यक्रमाचा समारोप झाला तेव्हा कैदी आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे तर कारागृह प्रशासनही गहिवरले होते.

डॉ. उपाध्याय यांची कल्पना !
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे राज्य कारागृहाचे प्रमुख असताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहात सुरू केला होता. वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक कैद्यांना संचित किंवा अभिवचन रजेवर जाता येत नाही. त्यामुळे त्या कैद्याची मानसिक स्थिती बिघडते. तो खचून जातो. अशा कैद्यांच्या १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना कारागृहात बोलवून कैद्यासोबत त्यांची भेट घडवून आणण्याची या उपक्रमामागे कल्पना होती. आज कार्यक्रमाच्या प्रारंभी कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही. सी. वानखेडे, कारखाना व्यवस्थापक आर. आर. भोसले, तुरुंगाधिकारी ए. एस. कांदे, कमलाकर मिराशे, डी. एस. आढे, विठ्ठल शिंदे, योगेश पाटील, संजीव हटवादे, सामाजिक कार्यकर्ते महादेव डोंगरे आणि मीना लाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: And the fragile walls of the Nagpur jail were smiled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग