शाब्बास रे पट्ठे !... अन् बेभान होऊन ती वाघाशी झुंजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:21 PM2018-04-04T23:21:29+5:302018-04-05T10:31:22+5:30

... क्षणात थेट वाघाशी झुंज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या समोर उभी राहिली. मी काठी उचलणार, तसाच वाघाने माझ्यावर हल्ला केला. मीही पूर्ण जोर एकवटून त्याला बाजूला फेकले... थेट वाघाशी झुंजणाऱ्या रुपालीने अंगावर रोमांच उभा करणारा त्या रात्रीचा थरार वर्णन केला.

... and I struggled with the tiger deleriously | शाब्बास रे पट्ठे !... अन् बेभान होऊन ती वाघाशी झुंजली

शाब्बास रे पट्ठे !... अन् बेभान होऊन ती वाघाशी झुंजली

Next
ठळक मुद्देरुपालीनेच सांगितला ‘त्या’ रात्रीचा थरार : उपचारासाठी मायलेकी नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्री १२.३० च्या दरम्यान घरासमोर बांधलेली शेळी ओरडल्याने दार उघडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेळीजवळ गेली. मात्र पाठीमागे साक्षात ढाण्या वाघ उभा असल्याचे माझ्या लक्षात आले. मी प्रचंड घाबरली. हा आपल्याला आता मारणार..., मला मारल्यानंतर माझ्या आईला कोण सांभाळेल... आणि मला मारल्यानंतर आईवरही हल्ला केला तर... असे असंख्य प्रश्न एका क्षणात मनात आले. आता त्याच्याशी लढण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेत त्याच क्षणात थेट वाघाशी झुंज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या समोर उभी राहिली. मी काठी उचलणार, तसाच वाघाने माझ्यावर हल्ला केला. मीही पूर्ण जोर एकवटून त्याला बाजूला फेकले... थेट वाघाशी झुंजणाऱ्या रुपालीने अंगावर रोमांच उभा करणारा त्या रात्रीचा थरार वर्णन केला.
वाघ अचानक समोर आला तर कुणाचाही घाम फुटणार नाही तर नवल. त्याच्याजवळ जाण्याचीही कुणी हिंमत करणार नाही. परंतु, घरात शिरलेल्या वाघाशी रुपाली मेश्राम या तरुणीने निकराची झुंज दिली व वाघाचा हल्ला परतवून लावला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात नागझिरा वनक्षेत्राजवळ असलेल्या उसगाव निवासी रुपाली व तिची आई जीजाबाई मेश्राम यांनी २४ मार्चच्या रात्री हा थरारक अनुभव घेतला. वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघी मायलेकी सध्या नागपुरात उपचार घेत आहेत. वाघ समोर असल्याने माझ्यासमोर लढण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आमच्या शेळीला मारले व आईच्या विचाराने मला त्याच्याशी लढण्याची शक्ती मिळाल्याचे रुपालीने सांगितले. त्याने पहिला हल्ला केला, मग मी त्याला काठीने मारले. वाघाने डोक्यावर, खांद्यावर नखाने ओरबाडले आणि मीही आपल्या शक्तिनिशी त्याचा हल्ला परतवीत होते. कंबरेवर पंजा मारल्यानंतर मात्र प्रचंड वेदना झाल्या व मी ‘आई’ म्हणून ओरडले. तशी माझी आई बाहेर आली. आईनेही काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईवरही त्याने जोरदार हल्ला केला. त्यामुळे मला संताप आला व मी आणखी जोरात त्याच्याशी भिडल्याचे रुपाली म्हणाली.
वाघ आणि मायलेकीची झटापट १० ते १५ मिनिटे चालली. मी बेभान होऊन त्याला पराभूत करण्यासाठी लढत होते. अशात आईने संधी पाहून मला आतमध्ये ओढत नेले आणि वाघही तेथून पळून गेल्याचे तिने सांगितले. या अवस्थेत तिने इतरत्र फोन लावले.
मायलेकीवर नागपुरात उपचार...
काही वेळानंतर वनविभागाचे सोनेगाव येथील पथक घरी आले व त्यांनी दोघींनाही साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नागपुरात मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी दोघींनाही सुटी झाली, मात्र औषधोपचार सुरुच आहेत. वन विभागाकडून उपचारासाठी दहा हजार रुपये दिल्याचे तिने सांगितले. नागपुरात कुणीही नाहीत व सध्या मायलेकी भारतीय सेवक संगती या संस्थेच्या आसऱ्याने राहत आहेत.
स्कॉलरशीपच्या पैशाने घेतल्या होत्या शेळ्या
रुपालीची आई मजुरी करते व मोठा भाऊ भंडाऱ्यात मजुरीचीच कामे करतो. त्यांच्याकडे पाच शेळ्या होत्या. या शेळ्यांवर रुपालीचे विशेष प्रेम आहे. कारण तिने आईच्या मदतीसाठी स्कॉलरशीपच्या पैशाने शेळ्या घेतल्या होत्या. त्यातील तीन शेळ्या त्या दिवशी वाघाने मारल्याचे तिने सांगितले. त्यातील एक शेळी गर्भवती होती. शेळ्यांमुळे आम्हाला आर्थिक मदत होत होती. वाघाच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे ती म्हणाली.
 मला जॉब करायचा आहे
रुपालीने साकोलीच्या महाविद्यालयातून बीकॉम पूर्ण केले आहे. लवकर काम मिळावे म्हणून कॉम्प्युटर क्लास सुरू केल्याचे तिने सांगितले. मला शिकण्याची इच्छा आहे. पण माझ्या आईला मदत व्हावी म्हणून आधी जॉब मिळणे गरजेचे असल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: ... and I struggled with the tiger deleriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.