अन् मार्चमध्ये बरसला पाऊस; पुढचे तीन दिवस विदर्भात ऑरेंज अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 10:09 PM2023-03-14T22:09:57+5:302023-03-14T22:10:25+5:30
Nagpur News हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाच्या एक दिवसाआधीच मंगळवारी पावसाने हजेरी लावली. तप्त उन्हाच्या चटक्यांची सुरुवात हाेणाऱ्या मार्चमध्ये सरी बरसल्याने नागरिकांना गारव्याचा आनंद मिळाला.
नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाच्या एक दिवसाआधीच मंगळवारी पावसाने हजेरी लावली. तप्त उन्हाच्या चटक्यांची सुरुवात हाेणाऱ्या मार्चमध्ये सरी बरसल्याने नागरिकांना गारव्याचा आनंद मिळाला. पावसाच्या सरी सलग पडल्या नसल्या तरी उकाड्यापासून थाेडा दिलासा मात्र मिळाला. पुढचे तीन दिवस १७ मार्चपर्यंत नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट विभागाने जाहीर केला आहे.
मंगळवारी सकाळपासून आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. पारा मात्र चढलेला हाेता. दिवसभर ढगांची उघडझाप सुरू हाेती. त्यामुळे उन्हाचे चटके बसत नसले तरी उकाडा मात्र हाेत हाेता. दुपारनंतर वातावरणाचा रंग बदलला आणि पावसाळी स्थिती निर्माण झाली. ४ वाजताच्या दरम्यान सिव्हिल लाइन्सच्या परिसरात पावसाचे थेंब पडले. यानंतर मानकापूर, सदर भाग ओला झाला. सूर्यास्त हाेताच शहरात विजा व ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान रामदासपेठच्या भागात जाेराच्या सरी बरसल्या.
हवामान विभागाने १५ मार्चपासून पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. मात्र, वातावरणातील बदलाचा एक दिवसाआधीच परिणाम झाला. पश्चिमेकडे पश्चिमी झंझावात तयार झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेत ताे विदर्भाकडून कर्नाटककडे सरकत आहे. त्यामुळे पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे. हिमालय क्षेत्रात १६ मार्चला पुन्हा पश्चिमी झंझावात तयार हाेत असल्याने उन्हासह पावसाळी स्थिती तयार हाेत आहे. पुढचे तीन दिवस नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मार्चमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्याने आश्चर्यही व्यक्त हाेत आहे.
दिवसा पारा चढलेलाच
दरम्यान, ढगाळ वातावरण असले तरी दिवसाचा पारा वाढलेला हाेता. मंगळवारी ३६.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले. पावसामुळे रात्रीचा पारा मात्र घसरला. या प्रभावाने पुढचे तीन दिवस तापमान घटण्याची शक्यता आहे.
रघुजीनगरात अंधार
वादळासह पाऊस झाल्याने रघुजीनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरात अंधार पसरला हाेता. बराच काळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये राेष हाेता.