... अन् सन्मानाने सुरू होतो महाप्रवास!
By admin | Published: February 20, 2017 01:59 AM2017-02-20T01:59:13+5:302017-02-20T01:59:13+5:30
आयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही.
मुस्लीम बांधवांचे औदार्य : वर्षभरात २० बेवारस मृतदेहांचा केला दफनविधी
दयानंद पाईकराव नागपूर
आयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. बेवारस स्थितीत जीव सोडणाऱ्या अनेकांना तर आपल्या धर्मानुसार अंतिम संस्कारही लाभत नाहीत. मुस्लीम समाजातील अशा दुर्दैवी जीवांना सन्मानाने निरोप देण्याचे काम मोमिनपुरा येथील कब्रस्तान कमिटीचे सदस्य इमानेइतबारे करीत आहेत. या कमिटीने मागील वर्षभरात २० अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी केला आहे.
अनोळखी मृतदेहाची माहिती अनेकदा दोन-तीन दिवसानंतर दुर्गंधी सुटली की होते. अशा वेळी पोलीसही नाकाला रुमाल बांधून त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेणे, त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडणे ही कामे करतात. परंतु यात मृतदेहाची दुर्गंधी येत असल्यामुळे जिव्हाळा उरत नाही. परंतु कब्रस्तान कमिटी मोमिनपुराने रेल्वेस्थानकावरील अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. लोहमार्ग पोलिसांकडून अनोळखी मुस्लीम बांधवाचा मृतदेह असल्याचे पत्र मिळाल्यानंतर कमेटीचे सदस्य आपले तीन प्रतिनिधी पाठवून संबंधित मृतदेह मुस्लीम व्यक्तीचा आहे की नाही, याची खात्री करतात. खात्री पटल्यानंतर दुपारी मस्जिदमध्ये नमाद अदा करण्यापूर्वी तेथे उपस्थित मुस्लिम बांधवांना आपल्या एका अनोळखी मुस्लीम बांधवाचा दफनविधी करावयाचा असल्याचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ ते ३० मुस्लीम बांधव माणुसकीच्या नात्याने आणि घरातील सदस्याप्रमाणे मृतदेह शवविच्छेदनानंतर घेऊन जाणे, मृतदेहाला सुगंधी अत्तर लावून आंघोळ घालणे, नमाज अदा केल्यावर सन्मानाने त्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात येतो. मागील वर्षभरात नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांना १२० मृतदेह आढळले. यातील २० मृतदेह हे मुस्लीम समाजातील अनोळखी व्यक्तीचे होते. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीतर्फे करण्यात येणारे हे कार्य खरोखरच पुण्याचे असून इतरांनीही यापासून आदर्श घेण्याची गरज आहे.
‘कुठल्याही जाती, धर्मातील मृत व्यक्ती असो, त्याचा अंत्यविधी सन्मानाने होण्याची गरज आहे. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीला आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ते त्वरित प्रतिसाद देऊन संबंधित अनोळखी मृतदेहावर त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करतात.’
-अभय पान्हेकर, लोहमार्ग पोलीस निरीक्षक, नागपूर