अन् महापौरांनी गाडी थांबवून केली वाहतूक नियमांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:38 PM2020-02-26T23:38:09+5:302020-02-26T23:39:24+5:30
वाहतूक नियमांची शिस्त लावल्यास रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला फायदा आहे. वाहतूक नियमांचे पालन म्हणजे अपघातमुक्ती, असा मंत्र देत महापौर संदीप जोशी यांनी लॉ कॉलेज चौकात स्वत: वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक नियमांची शिस्त लावल्यास रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला फायदा आहे. वाहतूक नियमांचे पालन म्हणजे अपघातमुक्ती, असा मंत्र देत महापौर संदीप जोशी यांनी लॉ कॉलेज चौकात स्वत: वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.
शहरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाºया जनआक्रोश संस्थेतर्फे प्रत्येक बुधवारी शहरातील एका चौकात जनजागृती करण्यात येते. बुधवारी लॉ कॉलेज चौकात जनजागृती अभियान सुरू होते. दरम्यान, त्या भागातून संदीप जोशी गाडीने जात होते. ते जनआक्रोशच्या सदस्यांना बघून गाडी थांबवून खाली उतरले. जनआक्रोशच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी स्वत: जनजागृती मोहिमेत भाग घेतला.
महापौरांनी जनआक्रोशच्या सदस्यांसोबत चौकात उभे राहून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत सांगितले. शहर अपघातमुक्त व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिकेतर्फे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ‘मम्मी पापा मी टू’ अभियानाच्या माध्यमातूनही वाहतूक नियमांबाबत नागरिकांना जागरुक करण्यात आले होते. वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक वाहन चालकाची आहे. त्यामुळे स्वत: नियमांचे पालन करून वाहने चालवा आणि इतरांनाही त्याबाबत सांगा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जनआक्रोशच्या सदस्यांसह वाहतूक पोलीस आणि नागरिक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते.