अन् मुत्तेमवार झाले पास
By admin | Published: September 27, 2014 02:41 AM2014-09-27T02:41:06+5:302014-09-27T02:41:06+5:30
निवडणुकीच्या धामधुमीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना शुक्रवारी एका परीक्षेला सामोरा जावे लागले.
नागपूर : निवडणुकीच्या धामधुमीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना शुक्रवारी एका परीक्षेला सामोरा जावे लागले. भल्याभल्यांना घाम आणणाऱ्या या परीक्षेत मुत्तेमवार यांनी चक्क १९ पैकी १७ गुण घेतले. शिकाऊ वाहन परवान्यासाठी आवश्यक असणारी ही संगणक चाचणी परीक्षा होती.
मुत्तेमवार यांचा मोटार वाहन परवाना काही वर्षांपूर्वी गहाळ झाला. त्यांचा परवानाही फार जुना होता. आरटीओमध्ये त्या संदर्भातील दस्तावेज उपलब्ध नव्हते. शुक्रवारी ते १२.१५ वाजता कार्यालयात पोहचले. त्यांनी आधीच अधिकाऱ्यांना सामान्यांसोबत परवान्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ते शिकाऊ परवान्याच्या रांगेत लागले. शुल्क भरले. छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर वाहतूक नियमांवर आधारित ते संगणक चाचणी परीक्षेला बसले. यावेळी त्यांच्यासह ३० उमेदवार परीक्षा देत होते. इकडे, २० प्रश्नाच्या परीक्षेत मुत्तेमवार यांना १९ प्रश्नांचीच उत्तरे देता आली. शेवटच्या प्रश्नावर संगणकाच्या बटनामध्ये बिघाड आला होता. अखेर निकाल हातात आला. मुत्तेमवार यांनी १९ पैकी १७ प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याचे जाहीर केले. याची बातमी बाहेर येताच ताटकळत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
मुत्तेमवार यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट न घेता सामान्यांसारखे वाहन परवाना काढल्याने आज दिवसभर आरटीओत चर्चा होती. मुत्तेमवार यांनीही आरटीओच्या या प्रणालीचे कौतुक केले. (प्रतिनिधी)