अन् नागपूरकरांमुळेच काका झाला स्टार!
By admin | Published: July 18, 2015 02:48 AM2015-07-18T02:48:20+5:302015-07-18T02:48:20+5:30
राजेश खन्ना म्हणजे रसिकांचा आवडता अभिनेता. आनंद सिनेमात त्याच्या खास अंदाजात ‘बाबु मोशाय...’ म्हणणारा राजेश खन्ना आणि त्याचा लाजवाब अभिनय आम्ही कधीच विसरलो नाही.
सुपरस्टार राजेश खन्ना यांची तृतीय पुण्यतिथी : अभिनयाच्या कारकीर्दीला नागपुरातूनच प्रारंभ
राजेश पाणूरकर नागपूर
राजेश खन्ना म्हणजे रसिकांचा आवडता अभिनेता. आनंद सिनेमात त्याच्या खास अंदाजात ‘बाबु मोशाय...’ म्हणणारा राजेश खन्ना आणि त्याचा लाजवाब अभिनय आम्ही कधीच विसरलो नाही. पण कॅन्सर झालेला आनंद विलक्षण ताकदीने उभा करणारा राजेश खन्ना आता खरेच नाही. आनंद चित्रपटातले हे दृश्य काका हयात नसताना पाहताना मात्र डोळ्यांच्या पापण्या अलगद ओलावतात. आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांच्या हृदयात हात घालणारा आणि त्यांच्या भावनांना आवाहन करणारा राजेश खन्ना दुसरीकडे ‘किंग आॅफ रोमान्स’ होता. गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुपरस्टार राजेश खन्नाची कारकीर्द मात्र नागपुरातून सुरू झाली. दस्तुरखुद्द राजेश खन्ना यांनीच त्यांच्या आयुष्यात नागपूरचे योगदान खूप मोठे असल्याचे मान्य केले होते.
नागपूरला राज्य शासनाच्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. साल १९६७. त्यावेळी एका नाट्य संस्थेकडून एक तरुण कलावंत नाटकासाठी आला. त्याचे नाव होते जतीन खन्ना. जतीन खन्नाबाबत कुणालाही नागपुरात फारसे काही माहीत नव्हते. नाट्य संस्थेचे हे सारे कलावंत नाटक सादर होण्याच्या दोन दिवस आधी आले. त्यावेळी नाटकातील कलावंतांसह मूख्य भूमिकेत असणारा जतीन खन्नाही नागपुरात तब्बल तीन दिवस थांबला होता. नाटकाचे नाव होते ‘मेरे देश के गाव...’. स्पर्धेत हे नाटक सादर करण्यात आले आणि जतीन खन्नाच्या अभिनयाने तत्कालीन नागपूरकर रसिकांना जिंकले. फारसा परिचित नसलेला जतीन खन्ना या स्पर्धेतूनच लोकांच्या समोर आला. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ‘मेरे देश के गाव’ या नाटकाला आणि उत्कृष्ट अभिनयासाठी जतीन खन्नालाही पुरस्कार मिळाला. त्यावेळी रसिकांनी जतीन खन्नाला डोक्यावर घेतले होते.
त्यानंतर जतीन खन्ना मुंबईच्या मायानगरीत आला. त्याच्या मामांच्या सांगण्यावरून त्याने राजेश हे नाव धारण केले आणि जतीनचा राजेश खन्ना झाला. त्याच काळात राजेश खन्नाचे आखरी खत, बहारो के सपने आणि राज हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि राजेश खन्नाच्या प्रेमापोटी नागपूर-विदर्भात हे सिनेमे तुफान चालल्याचा इतिहास आहे. राजेश खन्ना नंतर सुपरस्टार झाला आणि १५ सोलो हिट सिनेमा त्याने दिले पण राजेश खन्नाचे नागपूरशी सातत्याचे ऋणानुबंध राहिले. हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत नागपुरात मिळालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील पहिला सर्वात मोठा पुरस्कार होता. या पुरस्काराने माझ्यातला आत्मविश्वास दुणावला आणि अभिनयात कारकीर्द करण्याची आपली क्षमता असल्याचे मला जाणवले. त्यामुळे नागपुरातूनच मला प्रेरणा आणि बळ मिळाले. येथूनच माझ्या कारकीर्दीला प्रारंभ झाला आणि नागपूरकरांनीच मला स्टार केले, असे विधान राजेश खन्ना यांनी नागपूरकरांसमोरच केले होते. आता राजेश खन्ना नाही पण या महान अभिनेत्याशी नागपूरकरांचे जवळचे संबंध होते. त्याची आठवण नागपूरकरांच्या मनात कायम आहे.
सुपरस्टार आणि खासदार झाल्यावरही राजेश खन्ना नागपूरला विसरला नाही. त्याने त्याला प्रोत्साहन देणाऱ्या येथल्या रसिकांविषयी कायम कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळेच आज त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त राजेश खन्ना यांची आठवण नागपूरकरांना येणे स्वाभाविक आहे.